Ceiling Fans: घरातील पंखे बदलून वाचवता येईल वीज; कमी होईल खिशावरचा भार, पर्यावरणालाही लागेल हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 06:42 PM2022-12-20T18:42:46+5:302022-12-20T18:46:44+5:30

भारतातील ९० टक्के घरांमध्ये सीलिंग फॅन वापरले जातात आणि त्यातील फक्त ३ टक्के ऊर्जासक्षम पंखे वापरतात. सध्या वापरात असलेल्या एकूण ४१० दशलक्ष सीलिंग फॅन्समध्ये ५६ टक्के वाटा घरगुती क्षेत्राचा आहे आणि यात दरवर्षी ४४ दशलक्ष पंख्यांची भर पडते आहे.

environment friendly BLDC ceiling fans for energy efficient performance | Ceiling Fans: घरातील पंखे बदलून वाचवता येईल वीज; कमी होईल खिशावरचा भार, पर्यावरणालाही लागेल हातभार

Ceiling Fans: घरातील पंखे बदलून वाचवता येईल वीज; कमी होईल खिशावरचा भार, पर्यावरणालाही लागेल हातभार

googlenewsNext

>> आशिष मालवीय

जगभरात हवामान बदलाचे भयंकर परिणाम दिसून येत आहेत. भारत काही याला अपवाद नाही. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतो आहे आणि सातत्याने हवामानातील अतितीव्र बदलांमुळे नैसर्गिक आपत्ती ओढवत आहेत. यंदाच्या मे महिन्यात भारतातील सरासरी तापमान ४९ अंश सेल्सिअस (१२० फे.) वर पोहोचले. त्याआधीच मार्चमध्ये भारतात मागील १२२ वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली होती. वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे लोकसंख्येचीही वाढ होत आहे आणि भारतातील विकास धोरणांमध्ये भविष्यात ऊर्जेची मागणी वाढत जाईल, असे चित्र आहे. परिणामी, आपण आताच काही ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर हवामानावर होणारे परिणाम अधिक गडद असतील आणि तापमान अधिकच वाढत जाईल. अर्थात, या उपाययोजना हाती घेण्याची जबाबदारी फक्त भारतातील उद्योगक्षेत्रावर नाही तर नागरिकांवरही आहे. यातील सगळ्यात सहजसोपा उपाय म्हणजे घरातील जुन्या पद्धतीचे पंखे आणि दिवे अशा घरगुती उपकरणांसाठी ऊर्जा बचत करणारे पर्याय वापरणे. 

भारतात हवा थंड करण्यासाठी सीलिंग फॅन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सध्या वापरात असलेल्या एकूण ४१० दशलक्ष सीलिंग फॅन्समध्ये ५६ टक्के वाटा घरगुती क्षेत्राचा आहे आणि यात दरवर्षी ४४ दशलक्ष पंख्यांची भर पडते आहे. उर्वरित ४४ टक्क्यांमध्ये व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्राचा समसमान वाटा आहे. घरगुती स्तरावरील एकूण वीज वापरात पंख्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेचा वाटा लक्षणीय आहे. मात्र, ब्रशलेस डीसी (बीएलडीसी) पंख्यांमुळे ही टक्केवारी बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. पारंपरिक सीलिंग फॅन्सच्या तुलनेत हे पंखे फारच कमी वीज वापरतात. सर्वसाधारण इंडक्शनवर आधारित पंख्यासाठी, आकारानुसार ५५ ते ९० वॅट वीज वापरली जाते. तर बीएलडीसी पंख्यांसाठी फक्त २८ ते ३५ वॅट वीज वापरली जाते.

बीएलडीसी पंख्यांसारख्या ऊर्जा-सक्षम उपकरणांच्या वापरातून अपेक्षित परिणाम साधण्यासाठी त्यांचा व्यापक स्तरावर वापर व्हायला हवा आणि त्यासाठी ही उपकरणे वाजवी दरात सर्वसामान्य माणसाला उपलब्धही असायला हवीत. यातूनच गरज निर्माण होते, अनोख्या व्यवसाय धोरणांची आणि सार्वजनिक-खासगी भागीदाऱ्यांवर आधारित नाविन्यपूर्ण बिझनेस मॉडेलची. ऊर्जा सक्षम उत्पादनांची सार्वजनिक स्तरावरील खरेदी करणे अशा बाजारपेठेत बदल घडवणाऱ्या धोरणांच्या माध्यमातून सरकार आणि सरकारी संस्था या प्रकारच्या उपक्रमांना पाठबळ देऊ शकते. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी (बीईई)ने १ जुलै २०२२ पासून सीलिंग फॅन्सवर बीईई स्टार लेबल असणे अनिवार्य केले आहे. सरकारचे हे पाऊल स्वागतार्ह आहे. उजाला (UJALA- Unnat Jyoti by Affordable LEDs for All) उपक्रमाअंतर्गत, ईईएसएलने मागणीला चालना आणि घाऊक खरेदीच्या माध्यमातून एलईडी बल्ब आणि ट्युब लाईट्सच्या किमती खाली आणण्याचे धोरण स्वीकारले. हीच पद्धत बीएलडीसी पंख्यांसाठीही वापरली जाऊ शकते. उजाला उपक्रमाला प्रचंड यश मिळाले. त्यातून एलईडीजसाठी एक मोठी राष्ट्रीय बाजारपेठ तयार झाली. परिणामी देशातील उत्पादनाला चालना मिळाली आणि लाखो ग्राहकांना त्यांच्या घरातील पारंपरिक दिवे आणि बल्ब बदलून एलईडी दिवे लावणे शक्य झाले. त्याचप्रमाणे, नॅशनल एनर्जी एफिशिएंट फॅन प्रोग्रामच्या माध्यमातून ईईएसएलने बीएलडीसी पंख्यांची किंमत कमी केल्याने व्यापक अर्थकारणालाही चालना मिळाली.

भारतातील ९० टक्के घरांमध्ये सीलिंग फॅन वापरले जातात आणि त्यातील फक्त ३ टक्के ऊर्जासक्षम पंखे वापरतात. बीएलडीसी पंख्यांना बाजारपेठेत किती प्रचंड वाव आहे, हे या आकडेवारीवरून लक्षात येईल. यामुळे भारतीय ग्राहकांसाठी तसेच उद्योग क्षेत्रासाठी बीएलडीसी पंखे हे आकर्षक आणि किफायतशीर मूल्य देणारे उत्पादन ठरतात. या उत्पादनांची योग्य उपलब्धता, वाजवी दर आणि त्यातून मिळणाऱ्या फायद्यांबद्दल जनजागृती यामुळे देशभरात, अगदी दुर्गम भागातही बीएलडीसी पंख्यांचा व्यापक अवलंब होण्यास साह्य मिळेल. म्हणजेच, या उत्पादनांची गरज आणि आवश्यकता वाढेल.

बाजारपेठेतील आकडेवारी आणि आमचे अंदाज यानुसार, २०३० पर्यंत सीलिंग फॅन्सची संख्या ५७५ दशलक्षांहून अधिक असेल. खरे तर, बीएलडीसी सीलिंग फॅन्समुळे प्रचंड प्रमाणात वीज बचत होते आणि परिणामी आपलाच फायदा होतो. मात्र, जागरुकतेची वानवा आणि किंमत यामुळे आजही बाजारपेठेत या पंख्यांची संख्या कमी आहे. बीएलडीसी पंख्यांच्या बहूविध फायद्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आता स्पष्ट दिसत आहे. इतकेच नाही, जनसामान्यांना अधिक वाजवी दरात हे पंखे उपलब्ध करून देण्यात सरकारच्या धोरणांचीही मोठी मदत होईल. नागरिकांना वाजवी दरातील, ऊर्जासक्षम कुलिंग पर्याय उपलब्ध करून देण्यातील भारताच्या सध्याच्या आणि भविष्यातील प्रयत्नांमध्ये उजाला उपक्रम दीपस्तंभ बनू शकतो.

(लेखक ईईएसएलमध्ये उजाला उपक्रमाचे प्रमुख आहेत)

Web Title: environment friendly BLDC ceiling fans for energy efficient performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.