इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती निम्म्यावर येणार! हिमाद्री स्पेशालिटी चीनची सद्दी संपविणार; ओडिशात उभारणार जागतिक दर्जाचा प्लांट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:18 IST2026-02-10T13:18:12+5:302026-02-10T13:18:33+5:30
EV Battery Price India Production: हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स ओडिशात १,१२५ कोटींचा LFP कॅथोड प्लांट उभारणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती निम्म्यावर येऊ शकतात. वाचा सविस्तर बातमी.

इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती निम्म्यावर येणार! हिमाद्री स्पेशालिटी चीनची सद्दी संपविणार; ओडिशात उभारणार जागतिक दर्जाचा प्लांट
मुंबई: भारतीय वाहन बाजारात लवकरच मोठी क्रांती पाहायला मिळणार आहे. देशातील आघाडीची केमिकल कंपनी 'हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स'ने इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी लागणाऱ्या महत्त्वपूर्ण घटकाचे देशातच उत्पादन करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आता लिथियम आयन फॉस्फेट कॅथोड ॲक्टिव्ह मटेरियल तयार करण्यासाठी जागतिक स्तरावरील कंपन्यांशी चर्चा करत आहे. या प्रकल्पामुळे आगामी काळात इलेक्ट्रिक कार आणि दुचाकींच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या एकूण किमतीत बॅटरी पॅकचा वाटा ४० ते ५० टक्क्यांपर्यंत असतो. सध्या भारत या बॅटरी घटकांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्सने देशातच LFP मटेरियल उत्पादित केल्यास बॅटरी निर्मितीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल. काही तज्ज्ञांच्या मते, यामुळे ईव्हीच्या किमती निम्म्यावर येऊ शकतात.
ओडिशात भव्य प्रकल्प
कंपनी ओडिशा येथे वार्षिक २ लाख मेट्रिक टन क्षमतेचा प्लांट उभारणार आहे. यासाठी सुमारे १,१२५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. विशेष म्हणजे, चीनच्या बाहेर अशा प्रकारचे उत्पादन करणारा हा जगातील पहिलाच मोठा प्रकल्प ठरू शकतो. आर्थिक वर्ष २०२७ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत या प्लांटचे पहिले युनिट सुरू होण्याचे संकेत आहेत.
LFP बॅटरीचे वैशिष्ट्य
LFP बॅटरी सध्याच्या बॅटरीपेक्षा अधिक सुरक्षित मानली जाते. या बॅटरी उष्णता सहन करण्यास सक्षम असून यात आग लागण्याचा धोका कमी असतो. तसेच, या बॅटऱ्यांचे आयुष्य १० वर्षांपेक्षा जास्त असते आणि यात कोबाल्ट किंवा निकेल वापरले जात नसल्याने त्या पर्यावरणास पूरक आहेत.
भविष्यातील उद्दिष्ट
हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग चौधरी यांनी सांगितले की, पुढील ५ वर्षात १०० GWh क्षमतेच्या बॅटरीसाठी लागणारे LFP मटेरियल पुरवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. या प्रकल्पामुळे कंपनीचा नफा २०२८ पर्यंत १,१०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे.