इंस्टाग्राम, फेसबुक मेसेंजरवर येणार नवीन फिल्टर; व्हिडीओ कॉल करताना वापरता येतील AR फिल्टर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 01:08 PM2021-06-03T13:08:56+5:302021-06-03T13:09:39+5:30
Facebook F8 conference: नवीन फिल्टर्सच्या माध्यमातून कॉलमध्ये सहभाग असलेल्या लोकांना आपण एकाच ठिकाणी असल्याचा भास निर्माण करता येईल.
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने ऑगमेंटेड रिअॅलिटीवर आधारित फिल्टर्सची घोषणा केली आहे. हे फिल्टर्स इंस्टाग्राम आणि फेसबुकमेसेंजरवरून व्हिडीओ कॉल करताना वापरता येतील. फेसबुकने या फीचर्सची घोषणा F8 डेव्हलपर्स कॉन्फरन्सच्या माध्यमातून केली. हि कॉन्फरन्स ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती.
ऑगमेंटेड रिअॅलिटीवर आधारित फिल्टर्स आधीपासून या प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत परंतु, आता हे फिल्टर्स एकाचवेळी अनेक लोकांना अनुभवता येतील. कॉन्फरन्समध्ये कंपनीने सांगितले कि, एखाद्या कॉलमध्ये सहभागी असलेल्या लोकांना एकत्रितपणे अनुभव घेता यावा अश्या फिल्टर्सची निर्मिती आता क्रिएटर्सना करता येईल.
याबाबत उदाहरण देताना सांगण्यात आले कि, “या फिल्टर्सचा वापर करून कॉलमध्ये सहभागी होणारे लोक एकाच ठिकाणी आहेत असा भास निर्माण केला शकतो. मग ती शेकोटी असेल किंवा एखादा गेम.”
या फिल्टर्ससोबतच कंपनीने वापरकर्त्यांना व्यवसायिक खात्यांशी संपर्क करणे सोप्पे व्हावे म्हणून काही करण्यास घोषणा केली आहे. हे बदल लवकरच इंस्टाग्राम, फेसबुक तसेच व्हाट्सअॅपवर दिसून येतील.
काही दिवसांपूर्वी व्हाट्सअॅपवर एक नवीन फिचर आले होते. या फीचरमुळे आता व्हॉईस मेसेजेस वेगवेगळ्या वेगाने ऐकता येतील. तुम्ही व्हॉइस मेसेजेसचा वेग दीडपट आणि दुप्पट करू शकता. यामुळे एखादा लांबलचक व्हॉईस मेसेज देखील आता कमी वेळात ऐकता येईल.
त्याचबरोबर व्हाट्सअॅपने Laugh It Off नावाचा स्टिकर पॅक देखील काही दिवसांपूर्वी जोडला आहे. या पॅकमध्ये 28 नवीन स्टिकर्स देण्यात आले आहेत, जे अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर डाउनलोड करता येतील. विशेष म्हणजे हे अॅनिमेटेड आहेत.