फेसबुकच्या 26 कोटी युजर्सचा डेटा लिक, डार्क वेबवर हजारो रुपयांची लागली बोली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 10:14 PM2020-04-21T22:14:30+5:302020-04-21T22:15:46+5:30
फेसबुकच्या जवळपास 26.7 कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर विकला जात आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वा झूम अॅपच्या युजर्सचा डेटा विकल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता फेसबुकच्या युजर्सचा सुद्धा डेटा लिक झाला असून विकला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या 15 वर्षांत दरवर्षी फेसबुकचा डेटा लीक झाला आहे आणि प्रत्येकवेळी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. यातच आता पुन्हा एकदा फेसबुकच्या 26 कोटी युजर्संचा डेटा लिक झाल्याचे समोर आले आहे.
फेसबुकच्या जवळपास 26.7 कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर विकला जात आहे. हा डेटा डार्क वेबवर 542 डॉलर म्हणजेच जवळपास 41600 रुपयांना विकला जात आहे. युजर्सचे नाव, फेसबुक आयडी नंबर, वय, लास्ट कनेक्शन आणि मोबाईल नंबर असा डेटा लिक झाला आहे. हा डेटा पिशिंग अट्रॅक आणि स्पॅम ई-मेलसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे.
सिक्युरिटी रिसर्चर बॉब डियचेंकोने याबाबची माहिती दिली आहे. फेसबुकचा डेटा लिक झाल्याचा रिपोर्ट सर्वात आधी comparitech या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 26.7 कोटी फेसबुक युजर्सचा डेटा Elastisearch सर्व्हरवर उपलब्ध आहे. याशिवाय, हा डेटा हॅकर्स फोरमवरही अपलोड करण्यात आला आहे. फेसबुक युजर्सचा हा डेटा थर्ड पार्टी अॅप आणि कॅशे-कूकीजद्वारे लिक झाला आहे, असे म्हटले जात आहे. तसेच, Cyble च्या संशोधकांनी व्हेरिफिकेशनसाठी डेटा खरेदी केल्याचेही म्हटले जात आहे.
दरम्यान, तुम्ही Amibreached.com वर ई-मेल आयडी टाकून आपला डेटा लिक झाला आहे की नाही, हे पाहू शकता. या डेटा लिकप्रकरणी फेसबुकने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झूम अॅपच्या युजर्सचा डेटा विकला जात असल्याचे वृत्त समोर आले होते. ब्लीपिंग कम्प्युटरने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला होती की, झूमचे पाच लाख अकाऊंट हॅक करण्यात आहेत आणि डार्क वेबवर कमी किंमतीत युजर्सचा खासगी डेटा विकला जात आहे.
यासंबंधी सर्वात आधी एक एप्रिलला सायबर सिक्युरिटी फर्म Cyble ने माहिती दिली होती. रिपोर्टनुसार, डार्क वेबवर झूम अॅप युजर्सचा डेटा $0.0020 म्हणजे जवळपास 0.15 प्रति अकाऊंट विकले जात आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, हॅकर्सला आधीच माहिती होती, त्यामुळे नक्कीच पासवर्ड आणि आयडी हॅक केला आहे.