फेसबुक मॅसेंजर किडस् अ‍ॅप अँड्रॉइडवर दाखल

By शेखर पाटील | Published: February 16, 2018 12:45 PM2018-02-16T12:45:36+5:302018-02-16T12:46:07+5:30

खास बालकांसाठी विकसित करण्यात आलेले फेसबुक मॅसेंजर किडस् अ‍ॅप आता अँड्रॉइड प्रणालीसाठीदेखील सादर करण्यात आले आहे.

Facebook Messenger Kids app on Android | फेसबुक मॅसेंजर किडस् अ‍ॅप अँड्रॉइडवर दाखल

फेसबुक मॅसेंजर किडस् अ‍ॅप अँड्रॉइडवर दाखल

Next

खास बालकांसाठी विकसित करण्यात आलेले फेसबुक मॅसेंजर किडस् अ‍ॅप आता अँड्रॉइड प्रणालीसाठीदेखील सादर करण्यात आले आहे.

फेसबुकतर्फे गत डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी मॅसेंजर किडस् अ‍ॅप सादर करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात याला प्रायोगिक अवस्थेत आयओएस प्रणालीसाठी सादर करण्यात आले होते. आता हे अ‍ॅप अँड्रॉइड प्रणालीसाठी सर्वांना सादर करण्यात आले आहे. सध्याच्या नियमानुसार १३ वर्षांच्या आतील असणारे फेसबुक आणि फेसबुक मॅसेंजरचा वापर करू शकत नाहीत. मात्र लॉगीनमधील सुलभ प्रक्रियेमुळे याचे सर्रास उल्लंघन होत असते. यातच सोशल मीडियात काय पहावे आणि काय नाही? याची समज बालकांना नसते. परिणामी, त्यांना अपरिपक्व वयातच भलतेच काही पहायला मिळते. या बाबींचा विचार करता फेसबुकने मॅसेंजर किडस् या नावाने स्वतंत्र चॅट अ‍ॅप सादर केले आहे. ही फेसबुक मॅसेंजरची खास मुलांसाठी असणारी आवृत्ती आहे. ६ ते १३ या वयोगटासाठी हे मॅसेंजर असेल. यात लॉगीन करण्यासाठी पालकाच्या अकाऊंटची आवश्यकता असेल. म्हणजेच यात मुलांचे पालक या अ‍ॅपसाठी लॉगीन करतील. यानंतर या अ‍ॅपवर पालकांचेच नियंत्रण असेल. म्हणजेच त्यांनी कुणाशी चॅटींग करावी आणि कुणाशी नाही? हे पालकच ठरवतील. तसेच हे अ‍ॅप इन्स्टॉल करण्यासाठी मुलांना स्वतंत्र अकाऊंटची आवश्यकत नाही. तर पालकांच्या अकाऊंटवरूनच याला इन्स्टॉल करता येणार आहे.
 
एकदा का मॅसेंजर किडस् हे अ‍ॅप इन्स्टॉल केले की, पालक आपल्या मुलांनी कुणाशी संपर्क करावा याची यादी निश्‍चित करू शकतात. त्यांनी अ‍ॅप्रुव्ह केलेल्या लोकांशी या मॅसेंजरवरून चॅटींग करता येईल. यात वैयक्तीक आणि ग्रुप या दोन्ही प्रकारच्या चॅटींगची सुविधा दिलेली आहे. चॅटींगमध्ये शब्द, प्रतिमा, इमोजी, अ‍ॅनिमेशन्स, व्हिडीओ, स्टीकर्स आदींचा समावेश असेल. या सर्व बाबी खास बालकांसाठी विकसित केलेल्या आहेत. म्हणजेच यात अ‍ॅडल्ट कंटेंट नसेल. तसेच मॅसेंजर किडस् अ‍ॅपमध्ये जाहिरातीदेखील नसतील असेल फेसबुकने स्पष्ट केले आहे. या माध्यमातून होणार्‍या संवादांना संबंधीत बालक डिलीट करू शकणार नाही. ते डिलीट करण्याचे अधिकार त्याच्या पालकांना असतील. यामुळे यावर खर्‍या अर्थाने पालकांचे नियंत्रण असणार आहे. विशेष बाब म्हणजे हे स्वतंत्र अर्थात स्टँडअलोन अ‍ॅप असून यात इन-अ‍ॅप परचेसींगची सुविधा नसल्याचेही फेसबुकने स्पष्ट केले आहे. हे अ‍ॅप आता अँड्रॉइडसाठीही लाँच करण्यात आले असून कुणीही ते गुगल प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करू शकणार आहे.

Web Title: Facebook Messenger Kids app on Android

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.