Facebook to Meta: नाव बदललं, आता जग अन् जगणं बदलायचंय; समजून घ्या 'फेसबुक'चं 'मेटा' करण्यामागचा 'मेगा' प्लॅन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 12:36 PM2021-10-29T12:36:12+5:302021-10-29T12:43:12+5:30

फेसबुकचे नाव बदलून 'मेटा' करण्यामागे, आपले भविष्यातले प्लॅन्सच जगासमोर आणणे हे मार्क झुकरबर्गचे ध्येय आहे. 'मेटा' अर्थात 'मेटावर्स' या तंत्रज्ञानाला 'सोशल जगताचे भविष्य' म्हणून पाहिले जाते.

Facebook Name Changed to Meta: Mark Zuckerberg's mega plan behind re-branding | Facebook to Meta: नाव बदललं, आता जग अन् जगणं बदलायचंय; समजून घ्या 'फेसबुक'चं 'मेटा' करण्यामागचा 'मेगा' प्लॅन 

Facebook to Meta: नाव बदललं, आता जग अन् जगणं बदलायचंय; समजून घ्या 'फेसबुक'चं 'मेटा' करण्यामागचा 'मेगा' प्लॅन 

googlenewsNext

>> प्रसाद ताम्हनकर

'अंकलिपी' माहिती नाही तो अडाणी.. अशी एक व्याख्या आहे म्हणे. याच धर्तीवर 'फेसबुक माहिती नाही तो डिजीटल अडाणी' अशी नवी म्हण तयार करायला हरकत नाही, इतके फेसबुक आणि त्याच्या जोडीदारांनी आपले आयुष्य व्यापले आहे. छोट्याश्या फेसबुकने बघता बघता बाळसे धरले आणि आज सोशल मीडिया जायंट बनले. आज इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप सारखे जगप्रसिद्ध सोशल प्लॅटफॉर्म फेसबुकच्या पंखाखाली आले आहेत, यावरून फेसबुकची ताकद ओळखता येईल. 

मात्र, फेसबुकच्या सर्वेसर्वा असलेल्या मार्क झुकरबर्गला फेसबुकची 'सोशल मीडिया कंपनी' ही ओळख आता पुसून टाकायची आहे हे नक्की. फेसबुकला त्याला आता 'सोशल टेक्नॉलॉजी कंपनी' बनवण्याच्या ध्येयाने झपाटले आहे. त्याचेच पहिले पाऊल म्हणजे, फेसबुकचे नामांतर आता ’मेटा’ (Meta Platforms inc) करण्यात आले आहे. या नामांतराची चर्चा जगभर झाली नसती तरच नवल…

फेसबुकचे नाव बदलून 'मेटा' करण्यामागे, आपले भविष्यातले प्लॅन्सच जगासमोर आणणे हे मार्क झुकरबर्गचे ध्येय आहे. 'मेटा' अर्थात 'मेटावर्स' या तंत्रज्ञानाला 'सोशल जगताचे भविष्य' म्हणून पाहिले जाते. आज फेसबुक प्रमाणे ’मायक्रोसॉफ्ट’ सारखी दिग्गज कंपनी देखील या ’मेटावर्स’ तंत्रज्ञानावर काम करते आहे. भविष्यातील तंत्रज्ञान म्हणून गाजत असलेल्या या तंत्रज्ञानाकडे जगाचे लक्ष लागलेले आहे. व्हर्च्युअल रियालिटी आणि ऑगमेंटेड रियालिटी यांची सांगड असलेल्या या तंत्रज्ञानात माणसे 'डिजीटल' अवतारात वावरू शकणार आहेत, एकमेकांना भेटू देखील शकणार आहेत. 'आभासी जग' अर्थात 'व्हर्च्युअल वर्ल्ड'चे हे भविष्यातील थक्क करणारे रूप असणार आहे. २००९ साली आलेल्या प्रसिद्ध अभिनेता 'ब्रुस विलीस'च्या 'सरोगेट्स' (Surrogates) या चित्रपटात आपण या संकल्पनेची थक्क करणारी झलक अनुभवू शकतो.

’मेटावर्स’ तंत्रज्ञानाच्या लोकप्रियतेची अनेक दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांना प्रचंड खात्री असून, फेसबुक तर चक्क या तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी १० हजार नवीन तंत्रज्ञांना कामावर घेण्याची तयारी देखील करत आहे. 

सायन्स फिक्शन कथा लिहिणार्‍या नील स्टिफन्सन यांनी १९९२ मध्ये आपल्या ’स्नो क्रॅश’ या कादंबरीमध्ये सर्वात पहिल्यांदा या 'मेटा' शब्दाचा उल्लेख केला होता. तेव्हा निव्वळ कल्पना असलेल्या या 'मेटा'च्या अद्भुत दुनियेपर्यंत आता आपण प्रत्यक्षात पोहोचलो आहोत असे म्हणायला हरकत नाही. 

मेटावर्स तंत्रज्ञानाला 'वर्क फ्रॉम होम'साठी अत्यंत उपयोगी तंत्रज्ञान देखील मानले जात आहे. यापूर्वी घरून काम करताना आपण सहकारी अथवा अधिकारी व्यक्तींशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधत असू किंवा व्हिडिओ कॉलिंग ॲपच्या मदतीने व्हर्चुअली टीम मीटिंगला हजेरी लावत असू. मात्र मेटावर्सच्या जगात तुम्ही अशा व्हिडिओ कॉलच्या प्रत्यक्ष आत असाल. डिजीटल रूपात तुम्ही प्रत्यक्ष मीटिंगला हजेरी लावू शकाल. ज्या व्यक्तीला फोन केला आहे, तो जिथे असेल उदा: ऑफिस, घर, रेस्टॉरंट इथे त्याच्यासमोर डिजीटल स्वरूपात प्रत्यक्ष भेटीचा आनंद घेऊ शकणार आहात. एवढंच कशाला मेटावर्स तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही व्हर्चुअली चित्रप्रदर्शनाला हजेरी लावू शकता, गाण्यांच्या मैफिलीचा आनंद लुटू शकता, चित्रपट पाहू शकता.. आणि ते ही तिथे प्रत्यक्षात उपस्थिती न लावता.

अर्थात, हे तंत्रज्ञान कितीही अद्भुत आणि जबरदस्त वाटत असले; तरी या तंत्रज्ञानामुळे नागरिकांची अत्यंत गोपनीय अशी माहिती सहजपणे तंत्रज्ञान कंपन्यांना हाताला लागण्याचा धोका सायबर सुरक्षा क्षेत्रातील काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत आणि ते खरे देखील आहे. यूजर्सच्या खासगी माहितीचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करण्याबद्दल फेसबुकसारखी कंपनी जगभरात कुप्रसिद्ध तर आहेच, पण अनेक मोठ्या देशात कायदेशीर कारवायांना देखील सामोरी जात आहे.

फेसबुकचे ’मेटा’ होत असले, तरी व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम या सोशल प्लॅटफॉर्म्सची नावे, आहे तीच राहणार आहेत. त्यामुळे फेसबुकच्या या नामांतराचा सामान्य यूजर्सवरती कोणताही थेट परिणाम होणार नाही हे नक्की.

Web Title: Facebook Name Changed to Meta: Mark Zuckerberg's mega plan behind re-branding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.