फेसबुक मॅसेंजरवरून आता पैसे ट्रान्सफर करता येणार, लवकरच येणार नवं फीचर
By शेखर पाटील | Published: April 27, 2018 11:20 AM2018-04-27T11:20:19+5:302018-04-27T11:20:19+5:30
लवकरच फेसबुक मॅसेंजरवरून पैशांची देवाण-घेवाण करता येणार असून या फिचरची चाचणी घेण्यात येत आहे. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव या फिचरला थोडा विलंब होणार असल्याचे वृत्त आहे.
मुंबई- लवकरच फेसबुक मॅसेंजरवरून पैशांची देवाण-घेवाण करता येणार असून या फिचरची चाचणी घेण्यात येत आहे. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव या फिचरला थोडा विलंब होणार असल्याचे वृत्त आहे.
अलीकडेच फेसबुकची मालकी असणार्या व्हाटसअॅपवर पेमेंट सिस्टीम प्रदान करण्यात आली असून ती केंद्र सरकारच्या युपीआय या प्रणालीवर आधारित आहे. या पार्श्वभूमिवर, लवकरच फेसबुक मॅसेंजरवरही ही प्रणाली सादर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अर्थात व्हाटसअॅपपेक्षा ही सिस्टीम वेगळी असणार आहे. यात पीअर-टू-पीअर म्हणजेच वैयक्तीक पातळीवरून पैशांची देवाण-घेवाण करता येणार असून याच्या जोडीला पीअर-टू-मर्चंट म्हणजेच व्यावसायिक व्यवहारदेखील करता येतील. सध्या ही सेवा बीटा अर्थात प्रयोगात्मक अवस्थेत देण्यात आलेली असून निवडक युजर्सच्या माध्यमातून याची चाचणी घेतली जात असल्याचे वृत्त फॅक्टर डेली या टेक पोर्टलने दिली आहे. याच्या पहिल्या टप्प्यात मोबाईल रिचार्जची सुविधा देण्यात आलेली आहे. ही चाचणी झाल्यानंतर याला अधिकृतपणे भारतीय युजर्ससाठी सादर करण्यात येणार आहे. तथापि, केंब्रीज अॅनालिटीका प्रकरण आणि त्यानंतरच्या घडामोडीनंतर फेसबुक मॅसेंजरवरील या पेमेंट सिस्टीमला थोडा विलंब होण्याची शक्यतादेखील या वृत्तात वर्तविण्यात आली आहे.