Facebook Server Down: ’सर्व्हर डाउन’ होतो म्हणजे नक्की काय रे भाऊ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 01:27 PM2021-10-05T13:27:21+5:302021-10-05T13:27:45+5:30

फेसबुक, व्हॉटसऍप आणि इंस्टाग्राम या जगभरातील तरुणाईत लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सेवा काही काळासाठी ठप्प झाली आणि सर्वत्र एकच गहजब उडाला.

Facebook Server Down What exactly does server down mean whatsapp instagram down for 7 hours | Facebook Server Down: ’सर्व्हर डाउन’ होतो म्हणजे नक्की काय रे भाऊ?

Facebook Server Down: ’सर्व्हर डाउन’ होतो म्हणजे नक्की काय रे भाऊ?

Next
ठळक मुद्देलोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सेवा काही काळासाठी ठप्प झाली आणि सर्वत्र एकच गहजब उडाला.

प्रसाद ताम्हनकर
फेसबुक, व्हॉटसऍप आणि इंस्टाग्राम या जगभरातील तरुणाईत लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सेवा काही काळासाठी ठप्प झाली आणि सर्वत्र एकच गहजब उडाला. अजूनही बर्‍याच देशातील यूजर्सला या सेवा वापरताना काही अडचणींना सामोरे जावे लागते आहे. अर्थात अशा प्रकारे सेवा बंद पडण्याची ही काही पहिली वेळ नाही. सर्वच सोशल मीडिया वेबसाइट अधेमधे ठप्प होत असतात. हा कालावधी नक्की कोणत्या अडचणीमुळे त्या बंद पडल्यात त्यावर अवलंबून असतो. या सर्व प्रकाराला ’सर्व्हर डाउन’ असे म्हटले जाते. हे ’सर्व्हर डाउन’ प्रकरण नक्की आहे तरी काय?
’सर्व्हर’ म्हणजे एक प्रकारचा संगणकच असतो किंवा संगणकात लोड केलेला प्रोग्राम देखील म्हणता येईल. त्याला जोडलेल्या दुसर्‍या संगणकाला, इतर डिव्हाइसेसना आणि यूजर्सना हवी ती सेवा पुरवण्याचे काम तो करत असतो. साधे उदाहरण घ्यायचे, तर ’यूट्यूब’चे घेता येईल. आपण जेव्हा ’यूट्यूब’वर एखादे गाणे अथवा चित्रपट शोधतो, तेव्हा ते गाण्याचे अथवा चित्रपटाचे नाव एका प्रकारच्या ’मागणी’ मध्ये बदलते आणि ती ’मागणी’ यूट्यूबच्या सर्व्हरपर्यंत पोचवली जाते. या सर्व्हरमध्ये आधीच यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या सर्व डाटा (गाणी, चित्रपट इ.) मधून आपल्याला हवा असलेला चित्रपट वा गाणे निवडून त्याप्रमाणे आपल्याला ’सर्च रिझल्ट’ दाखवण्यात येतात. 

गूगल हे जगातील सर्वात मोठे ’सर्च इंजिन’ आहे. हे देखील आपण सर्च केलेल्या माहितीसाठी त्या माहितीशी संबंधित सर्व वेबसाइटच्या सर्व्हर्सच्या माध्यमातून आपल्याला शेकडो ’सर्च रिझल्ट्स’ उपलब्ध करून देत असते. एखादी फाइल डाऊनलोड करणे, गाणी ऐकणे, ऑनलाईन चित्रपट बघणे, फेसबुक-इंस्टाग्राम-व्हॉट्सऍप- ट्विटर अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मुशाफिरी करणे अशा अनेक गोष्टींना या सर्व्हरची मदत मिळत असते. असा हा अत्यंत महत्त्वाचा असा सर्व्हर जेव्हा काम करणे थांबवतो, अथवा सेवा देणे बंद करतो; तेव्हा त्याला ’सर्व्हर डाउन’ असे म्हटले जाते.

’सर्व्हर डाउन होणे’ अर्थात सर्व्हरचे काम थांबण्यामागे अनेक कारणे असू शकतात. उदा: ऍप्लिकेशन क्रॅश होणे, नेटवर्क बंद पडणे अथवा त्यात अडथळे येणे, हॅकर्सकडून सर्व्हरवर हल्ला होणे, पॉवर फेल किंवा सिस्टम क्रॅश होणे इत्यादी. कारण कोणतेही असो, त्यामुळे सर्व्हरच्या कामात अडथळा निर्माण झाला की, यूजर्सला सेवा मिळण्यात ताबडतोब अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते. नुकत्याच झालेल्या ’सर्व्हर डाउन’ मागे नक्की कोणते कारण होते, ते अजूनही कंपनी तर्फे स्पष्ट करण्यात आलेले नसले, तरी या संदर्भात दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे काल बंद पडलेल्या सर्व सेवा फेसबुक-इंस्टाग्राम-ट्विटर या सर्व एकाच कंपनीच्या ’फेसबुक’च्या मालकीच्या आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुकतेच एका ’व्हिसलब्लोअर’ने फेसबुक विरुद्ध केलेले आरोप होय.

फेसबुकची माजी कर्मचारी असलेल्या एका महिलेने एक दिवस आधीच अमेरिकन टीव्हीवर येऊन फेसबुकवर काही गंभीर आरोप लावले होते. फेसबुक लोकांच्या सुरक्षेपेक्षा स्वत:च्या फायद्याकडे जास्ती लक्ष देते, तसेच वर्णभेद, धार्मिक कट्टरता, हेट स्पीच अशा गोष्टींना देखील फेसबुकमुळे चालना मिळते आहे, आणि हे स्वत: फेसबुकने केलेल्या सर्व्हेत उघड झाले आहे असा दावा या महिलेने केला आहे. ती स्वत: या सर्व्हे करणार्‍या टीमचा एक हिस्सा होती असे देखील तिचा दावा आहे. या ’व्हिसलब्लोअर’ प्रकरणाचा या ’सर्व्हर डाउन’शी काही संबंध असण्याची शक्यता काही तज्ज्ञ बोलवून दाखवत आहेत.

या सगळ्या प्रकरणात फेसबुकचा मात्र बराच तोटा झाल्याचे दिसते आहे. कंपनीला जाहिरातींद्वारे मिळणार्‍या एका मोठ्या उत्पन्नाला यामुळे मुकावे लागले आहे. फेसबुकला या काळात प्रत्येक तासाला तब्बल १ मिलियन डॉलर्स म्हणजे ७.४५ करोड रुपयांचे नुकसान झाले आहे. फेसबुक कंपनीचा शेअर देखील ५ टक्क्याने खाली आला आहे.

Web Title: Facebook Server Down What exactly does server down mean whatsapp instagram down for 7 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.