फेसबुक अशासाठी करतेय तुमच्या मोबाईलचा वापर....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 06:29 PM2018-09-28T18:29:45+5:302018-09-28T18:30:01+5:30
नवी दिल्ली : फेसबुकवर सुरक्षेसाठी दिलेल्या मोबाईल नंबरचा वापर जाहिरातींचे गिऱ्हाईक बनविण्यासाठी करत असल्याचे फेसबुकने मान्य केले आहे. टेकक्रंच च्या अहवालानुसार फेसबुकच्या प्रवक्त्याने ही गंभीर बाब कबुल केली आहे.
फेसबुकवर सुरक्षेच्या कारणासाठी प्रोफाईलवर काही वर्षांपूर्वी मोबाईल नंबर वापरकर्त्यांनी दिले होते. या मोबाईल नंबरचा वापर फेसबुक जाहिराती दाखविण्यासाठी करत आहे. द्विस्तरीय सुरक्षेसाठी वापरकर्त्यांचा मोबाईल नंबर मागण्यात आला होता. मात्र, लॉगईन सुरक्षेऐवजी फेसबुकने या नंबरता गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे.
आम्ही वापरकर्त्यांची मोबाईल नंबरसह जी माहिती गोळा करतो, ती कशासाठी वापरतो याची कल्पना आहे. मात्र, वापरकर्ते त्यांनी टाकलेली माहिती कधीही नष्ट करू शकतात, असेही या प्रवक्त्याने सांगितले.
फेसबुक वापरकर्त्यांच्या माहितीचा दुरुपयोग करत असल्याची धक्कादायक माहिती गेल्या काही महिन्यांत उघड झाली होती. यासाठी फेसबुकचा मालक झुकरबर्गला अमेरिकेच्या न्यायालयाने फटकारलेही होते. गिझमोडो या वेबसाईटनेही फेसबुक आपल्या मोबाईल नंबरचा वापर जाहीरातींचे गिऱ्हाईक बनविण्यासाठई करत असल्याचा खुलासा केला होता. अमेरिकेच्या दोन विद्यापिठांच्या अहवालामध्येही ही बाब नमूद करण्यात आली होती. यामध्ये फेसबुकसारख्या सोशल मिडिया कंपन्या वापरकर्त्यांची कोणतीही खासगी माहिती जाहीरातबाजीसाठी करत असल्याचे म्हटले होते.