आता तुमचं गाव झळकणार फेसबुकवर!, एका क्लिकवर सर्व माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 10:58 AM2018-02-25T10:58:39+5:302018-02-25T10:58:39+5:30
गावात नव्याने काय चालले आहे, कोणत्या योजना राबवल्या जात आहेत, गावाचे ऐतिहासिक महत्व काय, गावाची यशोगाथा यांसह अनेक बाबींची महत्वाची माहिती फेसबुकवर मिळणार आहे.
मुंबई - सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून माणसे एकमेकांनी जोडली गेली आहेत. तसेच माहिती व संदेशांची देवाणघेवाणही अगदी काही सेकंदात होत आहे. माहितीसाठी ताटकळत राहण्याचे दिवस आता संपले आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील या साधनांचा आता सरकारी कामकाजातही वापर वाढला आहे.
याचाच एक भाग म्हणून फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गावाचे म्हणजे, जवळपास 44 हजार गावांचे 'व्हिलेजबुक पेज' तयार करण्याचा उपक्रम ग्रामविकास विभागाने हाती घेतला आहे. या पेजवर गावात नव्याने काय चालले आहे, कोणत्या योजना राबवल्या जात आहेत, गावाचे ऐतिहासिक महत्व काय, गावाची यशोगाथा यांसह अनेक बाबींची महत्वाची माहिती या पाहता येईल.
सरकारी योजनांची माहिती, गावातील कामकाजाचा आढावा आणि संदेश गावागावात पोहोचवता यावेत यासाठी फेसबूकची मदत घेण्याचे सरकारने ठरवले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील नागरिकाला आपल्या गावाशी संपर्क साधता यावा, गावाची माहिती मिळावी यासाठी गावाचे फेसबूक पेज तयार केले जात आहे. या पेजमध्ये गावाची सर्व माहिती दिली जाणार आहे. सरकारी योजना, गावांतील योजनांची माहितीसह अन्य महत्वाची माहिती या पेजवर एका क्लिकवर पाहता येईल.
या मोहिमेस लवकरच नगर जिल्ह्यातून सुरुवात होणार आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेने स्वतःचे पेज तयार केले असून या प्रमाणेच गावांचे पेज तयार केले जाणार आहे. या पेजवर व्हीडीओ कॉलिंग, कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेमुळे महत्वाच्या बैठका असल्यास प्रत्येक वेळी ग्रामसेवक किंवा गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेत येण्याची गरज राहणार नाही. या सुविधेद्वारे मुख्यमंत्र्यांपासून जिल्हा परिषदेच्या सीईओंपर्यंत वरिष्ठ अधिकारी काही वेळात स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकणार आहेत. त्यामुळे पेज तयार झाल्यानंतर त्याचा वापर कसा करावा, नागरिकांनी कशा पद्धतीने संपर्क साधावा, माहिती अपडेट करण्यासाठी काय करावे, याची माहिती संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.