फिफा १८ गेमची एंट्री: जाणून घ्या सर्व फिचर्स
By शेखर पाटील | Published: October 2, 2017 11:44 AM2017-10-02T11:44:19+5:302017-10-02T11:48:10+5:30
इए स्पोर्टस् या कंपनीने आधी जाहीर केलेला फिफा १८ हा गेम ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला असून भारतात तो ३ ऑक्टोबरपासून मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक आर्ट म्हणजेच इए स्पोर्टस या कंपनीच्या फिफा या मालिकेतील सर्व गेम्सला जगभरातील युजर्सची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे
इए स्पोर्टस् या कंपनीने आधी जाहीर केलेला फिफा १८ हा गेम ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला असून भारतात तो ३ ऑक्टोबरपासून मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक आर्ट म्हणजेच इए स्पोर्टस या कंपनीच्या फिफा या मालिकेतील सर्व गेम्सला जगभरातील युजर्सची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. याची अद्ययावत अर्थात १८ वी आवृत्ती अलीकडेच सादर करण्यात आली होती. या वर्षी जून महिन्यात लॉस एंजल्स येथे आयोजित करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक एंटरटेनमेंट एक्सपो म्हणजेच ई ३-२०१७ या प्रदर्शनीत फिफा १८ या गेमची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. जगभरातील गेमर्सला २९ सप्टेंबरपासून याला उपलब्ध करण्यात आले असून भारतीय गेमर्सला मात्र ३ ऑक्टोबरपासून याला खरेदी करता येणार आहे. हा आजवरचा सर्वात उत्तम दर्जाचा फुटबॉल गेम असल्याचे मानले जात आहे.
फिफा-१८ हा गेम फिफा अल्टीमेट टिम, करियर मोड, किक ऑफ आणि लोकल सीझन या चार मोडमध्ये गेमर्सला खेळणे शक्य आहे. यातील पहिल्या प्रकारात गेमरला उत्तम दर्जाचा संघ बांधणीची संधी मिळेल. यात ऑनलाईन आणि ऑफलाईन स्पर्धांसह चालू फुटबॉल सीझनमध्ये भागही घेता येणार आहे. यात मल्टीपल कंट्रोल प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. यामुळे याला हातात धरून अथवा जॉय कॉन्स वा मल्टीपल कंट्रोलरच्या मदतीने खेळता येणार आहे. गेमिंग कन्सोलवर खेळतांना यात ७२० पिक्सल्स (एचडी) क्षमतेची प्रतिमा दिसेल तर हे मॉडेल अन्य डिस्प्लेला जोडल्यास १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचे चित्रीकरण दिसू शकणार आहे.
फिफा १८ हा गेम प्लेस्टेशन ३ व प्लेस्टेशन ४, एक्सबॉक्स ३६० व एक्सबॉक्स १ तसेच निंतेंदो स्वीच या गेमिंग कन्सोलसह विंडोज प्रणालीसाठी सादर करण्यात आला आहे. याचे मूल्य ५५ ते ६० युरोच्या दरम्यान आहे. भारतात हा गेम अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार असून याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ३,६९९ रूपयांपासून सुरू होणारे आहे. तर अन्य शॉपींग पोर्टल्सवर मात्र हा गेम मूळ किंमतीपेक्षा अधिक मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे.
फिफा १८ हा गेम फुटबॉलच्या चाहत्यांसाठी एका पर्वणीसमान आहे. यात अगदी खर्याखुर्या फिफा संघटनेशी संलग्न असणार्या सर्व स्पर्धा, विविध देशांचे खेळाडू आदींचा समावेश करण्यात आला आहे. यात खर्या खेळाडूंच्या शैलीची हुबेहूब कॉपी करण्यात आली आहे. १२ देशांमधील ५२ विख्यात स्टेडियम्स आणि अन्य ३० मैदानांसह एकूण ८२ मैदाने उपलब्ध असतील. यामध्ये जगभरातील फुटबॉलच्या सर्व प्रिमीयर लीग आणि त्यातील खेळाडूंचा समावेश असेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे फिफा १८ या गेममध्ये अल्टीमेट टिम हे विशेष फिचर देण्यात आले आहे. याच्या अंतर्गत विद्यमान खेळाडूंसह पेले, मॅराडोना, रोनाल्डो, लेव्ह येशीन, थिएरी ऑन्री आदींसारख्या माजी दिग्गज खेळाडूंचा समावेश असणार्या संघाची निर्मिती करून त्यांच्या माध्यमातून खेळण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक गेमसाठी अगदी खर्याखुर्या फुटबॉल सामन्याप्रमाणे बहारदार समालोचनाची व्यवस्थादेखील यात असेल.
पहा: फिफा १८ गेमची झलक दर्शविणारा ट्रेलर.