स्मार्टफोनच्या डिस्प्लेवरच फिंगरप्रिंट स्कॅनर
By शेखर पाटील | Published: January 15, 2018 02:13 PM2018-01-15T14:13:52+5:302018-01-15T14:14:19+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असणारा ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर असणारा स्मार्टफोन विवो या कंपनीने प्रदर्शित केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असणारा ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर असणारा स्मार्टफोन विवो या कंपनीने प्रदर्शित केला आहे. लास व्हेगास शहरातील सीईएस-२०१८ या प्रदर्शनीत काही दिवसांपूर्वीच डोगी कंपनीने डिस्प्लेवरच फिंगरप्रिंट स्कॅनर असणारा स्मार्टफोन प्रदर्शित करून टेकविश्वाचे लक्ष वेधून घेतले होते.
अर्थात हे मॉडेल बाजारपेठेत येण्यासाठी अद्याप अवकाश आहे. या पार्श्वभूमीवर, विवो कंपनीनेही याच प्रकारातील मॉडेलचे अनावरण केले असून ते लवकरच बाजारपेठेत दाखल होणार असल्याचेही घोषित केले आहे. अर्थात ग्राहकांना डोगी कंपनीआधी विवोचा हा स्मार्टफोन वापरण्यासाठी मिळणार आहे. आजवर सर्व स्मार्टफोनमधील फिंगरप्रिंट स्कॅनर हे एक तर डिस्प्लेवर असणार्या होम बटणच्या खाली अथवा मागील बाजूस असतात. अर्थात याचा डिस्प्लेशी काहीही संबंध नसतो. मात्र विवो कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये होम बटणाच्या ठिकाणीच फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेले आहे. म्हणजे कुणीही तेथेच आपले बोट टेकवून हा स्मार्टफोन अनलॉक करू शकतो.
विवो कंपनीच्या या स्मार्टफोनमधील ऑन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरचे तंत्रज्ञान सायनॅप्टीक्स या कंपनीने विकसित केले आहे. याच्या अंतर्गत ओएलईडी डिस्प्लेखालीच स्कॅनर दिलेले आहे. होम बटनाच्या ठिकाणी डिस्प्लेवर बोट ठेवल्यानंतर याचे तातडीने ऑथेंटीकेशन करून लाईट लागतो. यानंतर स्मार्टफोनचा डिस्प्ले अनलॉक होतो. विवो कंपनीने हा स्मार्टफोन आणि यातील ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर या फिचरचीच माहिती सध्या जाहीर केली आहे. याचे नाव, अन्य फिचर्स आणि मूल्य आदींची माहिती येत्या काही दिवसांमध्ये याला लाँच करतांना घोषीत करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.