ब्लॉकचेनवर आधारित स्मार्टफोनच्या आगमनाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 01:40 PM2018-07-13T13:40:11+5:302018-07-13T13:44:32+5:30

सिरीन लॅब्ज या कंपनीने ब्लॉकचेन या तंत्रज्ञानावर आधारित असणारा फिन्नी स्मार्टफोन लाँच करण्याचे संकेत दिले असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

finney worlds first blockchain smartphone launching in 2018 | ब्लॉकचेनवर आधारित स्मार्टफोनच्या आगमनाचे संकेत

ब्लॉकचेनवर आधारित स्मार्टफोनच्या आगमनाचे संकेत

googlenewsNext

सिरीन लॅब्ज या कंपनीने ब्लॉकचेन या तंत्रज्ञानावर आधारित असणारा फिन्नी स्मार्टफोन लाँच करण्याचे संकेत दिले असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

काही महिन्यांपूर्वीच सिरीन लॅबने आपण ब्लॉकचेन या अभेद्य सुरक्षा कवच प्रदान करणार्‍या प्रणालीवर आधारित स्मार्टफोन तयार करणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी फॉक्सकॉन या कंपनीशी करारदेखील करण्यात आला होता. तसेच या मॉडेल्सचे सर्व फिचर्स आणि संभाव्य मूल्यदेखील जाहीर करण्यात आले होते. तसेच कंपनीच्या संकेतस्थळावरून यांची अगावू नोंदणीदेखील सुरू करण्यात आली आहे. आता विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार हा स्मार्टफोन लवकरच विविध देशांमध्ये लाँच करण्यात येणार असून याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.

ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान हे विविध क्षेत्रांमध्ये वापरण्यात येत आहे. याच तंत्रज्ञानाने सज्ज असणारा फिन्नी हा स्मार्टफोन या क्षेत्रातील ख्यातप्राप्त नाव असणार्‍या सिरीन लॅब्जने विकसित केला आहे. फिन्नी या स्मार्टफोनमध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. यामुळे यातील माहिती ही अतिशय सुरक्षित असेल. याशिवाय या स्मार्टफोनवरून विविध डिजीटल करन्सीजचा वापर करणार्‍या शॉपींग संकेतस्थळावरून सुलभ खरेदी करता येईल. प्रत्यक्षातील चलनाला डिजीटल चलनात परिवर्तीत करण्याची सोय यात असेल. यासाठी विविध टोकन्सचा वापर करण्यात येणार आहे. यात बीटकॉईन्ससारख्या डिजीटल करन्सीजचा सुलभ संग्रह करता येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे सध्या क्रिप्टो करन्सीजला आयरिस स्कॅन, फिंगरप्रिंट स्कॅन अथवा अगदी अक्षरांमधील पासवर्डच्या सहाय्याने वापरण्याची सुविधा या स्मार्टफोनमध्ये असेल. हे मॉडेल सिरीन ओएस या प्रणालीवर चालणारे असेल. आपले हे तंत्रज्ञान व ऑपरेटींग सिस्टीम अन्य कंपन्यांना देण्याची तयारीदेखील सिरीन लॅब्जने केली आहे. यामुळे लवकरच अन्य कंपन्यांचेही ब्लॉकचेन या तंत्रज्ञानावर आधारित स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल होतील अशी शक्यता आहे. आभासी चलन वापरणार्‍यांसाठी हा स्मार्टफोन अतिशय सुरक्षित पर्याय बनणार आहे. यामुळे याच कम्युनिटीला समोर ठेवून हे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. तसेच आपल्या स्मार्टफोनच्या सुरक्षेबाबत आग्रही असणार्‍यांनाही फिन्नी हे मॉडेल भावण्याची शक्यता आहे.

फिन्नी स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते २ टेराबाईटपर्यंत वाढविता येणार आहे. तर यामध्ये ३,२८० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. यामध्ये ड्युअल डिस्प्ले दिलेला आहे. यातील मुख्य डिस्प्लेवर स्मार्टफोनचे विविध फंक्शन्स वापरता येतील. तर मागच्या बाजूस असणार्‍या सेकंडरी डिस्प्लेवर नोटिफिकेशन्स पाहता येतील. यातील मुख्य कॅमेरा १२ तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असणार आहे.

फिन्नी स्मार्टफोनची अगावू नोंदणी करणार्‍यांना हे मॉडेल ८९९ डॉलर्समध्ये मिळणार आहे. मात्र लाँच झाल्यानंतर याचे मूल्य ९९९ डॉलर्स राहणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. अभेद्य सुरक्षा कवच असणारा हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेतदेखील लवकरच दाखल होऊ शकतो.

Web Title: finney worlds first blockchain smartphone launching in 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.