फिटबीट आयोनिक स्मार्टवॉचची घोषणा
By शेखर पाटील | Published: August 30, 2017 07:00 AM2017-08-30T07:00:00+5:302017-08-30T07:00:00+5:30
फिचर्सचा विचार केला असता, हे स्मार्टवॉच वॉटरप्रूफ आहे. यात हार्ट रेट मॉनिटर, जीपीएस ट्रॅकींग आदी सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. यात ‘रिलेटिव्ह एसपीओ२’ हे विशेष सेन्सर देण्यात आले आहे.
वेअरेबल्समधील मातब्बर कंपनी म्हणून ख्यात असणार्या फिटबीटने फिटबीट आयोनिक या नावाने आपले पहिले स्मार्टवॉच लाँच केले असून यात आरोग्यविषयक बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे.
वेअरेबल्स अर्थात परिधान करण्याजोग्या उपकरणांच्या निर्मितीत फिटबीट कंपनी आघाडीवर असली तरी अलीकडच्या काळात त्यांच्या मिरासदारीला मोठे आव्हान मिळाले आहे. अॅपल व सॅमसंगसारख्या कंपन्यांनी आपल्या स्पार्टवॉचमध्ये उत्तमोत्तम फिचर्स दिले आहेत. तर दुसरीकडे शाओमीसारख्या कंपन्यांनी किफायतशीर दरात फिटनेस ट्रॅकर, स्मार्ट बँड आदी उपकरणे सादर केल्यामुळे फिटबीट कंपनीच्या या क्षेत्रातील मिरासदारीला आव्हान मिळाला आहे. यावर मात करण्यासाठी फिटबीट स्मार्टवॉच सादर करणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू होती. यावर आता फिटबीट आयोनिक या मॉडेलच्या लाँचिंगमुळे शिक्कामोर्तब झाले आहे. फिटबीट आयोनिक हे स्मार्टवॉच २९९.९५ डॉलर्स इतक्या मूल्यात ग्राहकांना सादर करण्यात आले आहे.
फिचर्सचा विचार केला असता, हे स्मार्टवॉच वॉटरप्रूफ आहे. यात हार्ट रेट मॉनिटर, जीपीएस ट्रॅकींग आदी सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. यात ‘रिलेटिव्ह एसपीओ२’ हे विशेष सेन्सर देण्यात आले आहे. याच्या मदतीने रक्तातील ऑक्सीजनच्या प्रमाणाची माहिती मिळते. याच्या मदतीने ‘स्लीप अॅप्नीया’सारख्या निद्राविषयक विकारांवर अचूक नजर ठेवणे शक्य असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. विशेष म्हणजे यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल चार दिवसांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात चौरसाकृती टचस्क्रीन डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात एनएफसी कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. यात स्मार्टफोनवरील नोटिफिकेशन्स पाहता येतील. याशिवाय फिटबीट आयोनिक या मॉडेलमध्ये २.५ जीबी इतके इनबिल्ट स्टोअरेज देण्यात आले आहे. फिटबीट अॅपच्या सहाय्याने युजर आपला स्मार्टफोन याला अटॅच करू शकतो. यात थर्ड पार्टी स्मार्टफोन अॅप्लीकेशन्स वापरण्याची सुविधादेखील आहे. फिटबीट आयोनिक या मॉडेलची कंपनीच्या वेबसाईटवरून नोंदणी सुरू होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले असून ग्राहकांना प्रत्यक्षात हे स्मार्टवॉच ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहे.