Flipkart देणार 2 लाखांचे बिनव्याजी कर्ज; आयडीएफसी फर्स्ट बँकेशी केली भागेदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 06:18 PM2021-08-27T18:18:00+5:302021-08-27T18:19:39+5:30
Flipkart Easy Credit Loan Scheme: Flipkart Wholesale ने नवीन Easy Credit लोन स्कीमची घोषणा केली आहे. किराणा दुकानदार आणि रिटेलर्सना या स्कीमचा फायदा घेता येईल.
फ्लिपकार्टने लघु उद्योजकांसाठी नव्या लोन स्कीमची घोषणा केली आहे. कंपनीची डिजिटल बी2बी मार्केटप्लेस म्हणजे Flipkart Wholesale हे कर्ज देणार आहे. किराणा दुकानदार आणि रिटेलर्सना व्यापार सुरु ठेवण्यासाठी हे कर्ज देण्यात येणार आहे. यासाठी फ्लिपकार्टने IDFC First बँकेशी भागेदारी केली आहे.
बिजनेस स्टॅंडर्डने दिलेल्या माहितीनुसार, Flipkart च्या B2B मार्केटप्लेस Flipkart Wholesale च्या माध्यमातून किराणा दुकानदारांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येईल. या नवीन Easy Credit लोन स्कीमसाठी कंपनीने आयडीएफसी फर्स्ट बँकेसोबत भागेदारी केली आहे. हे कर्ज डिजिटल ऑनबोर्डिंगच्या माध्यमातून देण्यात येईल, म्हणजे संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन पार पडली जाईल. आयडीएफसी फर्स्ट बॅंक आणि इतर आर्थिक संस्था हे झिरो कॉस्ट लोन देतील.
या स्कीमची खासियत म्हणजे यातून मिळणारे कर्जावर 14 दिवसांसाठी कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. दुकानदार 5000 ते 2 लाखांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतील. फ्लिपकार्टला या स्कीमच्या माध्यमातून किराणा आणि रिटेलर्सना त्यांच्या व्यापारात मदत करण्याचा उद्देश आहे. सध्या Wallmart च्या मालकीच्या फ्लिपकार्टवर 35 कोटींपेक्षा जास्त रजिस्टर्ड युजर्स आणि मार्केटप्लेसवर तीन लाखांपेक्षा जास्त विक्रेते आहेत.