जगात पहिल्यांदाच... रोबोट बनला कंपनीचा सीईओ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 07:24 AM2022-09-08T07:24:32+5:302022-09-08T07:25:24+5:30
तांग यू कंपनीच्या ‘संघटनात्मक आणि कार्यक्षमता विभाग’मध्ये आघाडीवर असेल. सुमारे १० अब्ज डॉलर मूल्य असलेल्या कंपनीच्या कामकाजावर देखरेखीची जबाबदारी तांग यूवर असेल.
बीजिंग : एखाद्या साय-फाय चित्रपटाप्रमाणेच एका चिनी मेटाव्हर्स कंपनीने चक्क रोबोटची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मल्टिप्लेअर ऑनलाइन गेम विकसित आणि ऑपरेट करणाऱ्या, तसेच मोबाइल ॲप्लिकेशन बनवणाऱ्या ‘नेटड्रॅगन वेबसॉफ्ट’ कंपनीने अलीकडेच आपली मुख्य उपकंपनी, ‘फुजियान नेटड्रॅगन वेबसॉफ्ट’चे नवीन सीईओ म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित आभासी मानवीय रोबोट ‘मिस तांग यू’ची नियुक्ती जाहीर केली. ‘मिस तांग यू’ कार्यकारी पद धारण करणारा जगातील पहिला रोबोट ठरला.
‘मिस तांग यू’ काय काम करणार?
तांग यू कंपनीच्या ‘संघटनात्मक आणि कार्यक्षमता विभाग’मध्ये आघाडीवर असेल. सुमारे १० अब्ज डॉलर मूल्य असलेल्या कंपनीच्या कामकाजावर देखरेखीची जबाबदारी तांग यूवर असेल. कंपनीने म्हटले की, ‘तांग यू प्रक्रियेचा प्रवाह सुव्यवस्थित करील, कामाची गुणवत्ता वाढवेल. तांग यू एक रिअल-टाइम डेटा हब म्हणून दैनंदिन कामकाजात तर्कसंगत निर्णयांना समर्थन देण्यासाठी विश्लेषणात्मक साधन म्हणून काम करील.