लवकरच लष्करी जवानांसाठी स्वतंत्र मोबाइल फोन
By शेखर पाटील | Published: August 31, 2017 10:27 AM2017-08-31T10:27:21+5:302017-08-31T10:31:35+5:30
सुरक्षेच्या मुद्यावरून सुरू असणारा वाद पाहता सरकार लवकरच लष्करी जवान तसेच अधिकार्यांसाठी स्वतंत्र मोबाइल फोन आणि नेटवर्क सुरू करणार असल्याचे वृत्त आहे.
सध्या मोबाइल फोनबाबत सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे. बहुतांश स्मार्टफोन उत्पादक कंपन्या विदेशी असून त्यांचे माहिती साठवणूक करणारी यंत्रणादेखील (सर्व्हर) विदेशात आहेत. यातच मध्यंतरी काही चिनी कंपन्या युजर्सची गोपनीय माहिती आपल्या सरकारला देत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या बाबींचा विचार करता लष्करी जवान आणि अधिकार्यांच्या मोबाइल फोनमधील गुप्त माहिती तसेच त्यांच्या संदेशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच बहुतांश लष्करी कर्मचारीदेखील आपापल्या मोबाइल फोनवरूनच इंटरनेटचा वापर करत असतात. या बाबींचा विचार करता त्यांच्यासाठी स्वतंत्र मोबाइल नेटवर्क तसेच हँडसेट निर्मित करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. भारतात लष्करी, निमलष्करी आणि सीमा सुरक्षा बलांचे सुमारे ५० लाखांपेक्षा जास्त कर्मचारी व अधिकारी आहेत. त्यांना हा विशेषरित्या तयार करण्यात आलेला मोबाइल फोन प्रदान करण्यात येणार आहे. तर त्यांच्यासाठी मोबाइल नेटवर्क सेवा पुरवठादार कंपनीदेखील स्वतंत्र असेल. शक्यतो एखादी भारतीय कंपनी यासाठी निवडण्यात येईल. यामुळे संबंधीत कंपनीचे सर्व्हर भारतात असल्यामुळे वेळप्रसंगी गोपनीय माहिती मिळविण्यात काहीही अडचण होणार नाही. तसेच यामुळे विदेशात माहिती जाण्याचा धोकादेखील कमी होऊ शकतो.