अनोळखी कॉल्सच्या त्रासातून आता सुटका, व्हॉट्सॲपचे ‘अननोन कॉलर’ फीचर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 07:14 AM2023-06-22T07:14:49+5:302023-06-22T07:15:23+5:30
या फीचरच्या मदतीने व्हॉट्सॲपवर अनोळखी क्रमांकावरून येणारे कॉन्स आपोआप म्यूट केले जाते.
नवी दिल्ली : मागील काही दिवसांमध्ये व्हॉट्सॲपवर येणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या कॉल्समुळे अनेक यूजर्सची फसवणूक होत असल्याचे पुढे आले होते. विशेषतः व्हिडीओ कॉलद्वारे सर्वाधिक फसवणूक झाल्याचेही निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲपने नुकतेच ‘सायलेंट अननोन कॉलर’ फीचर लॉन्च केले. या फीचरच्या मदतीने व्हॉट्सॲपवर अनोळखी क्रमांकावरून येणारे कॉन्स आपोआप म्यूट केले जाते.
व्हॉट्सॲपची पालक कंपनी असलेल्या मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गने याबाबतची माहिती दिली. हे फीचर भारतासह जगभरात लॉन्च झाले आहे. तुमच्या व्हॉट्सॲपवर हे फीचर उपलब्ध झाले नसेल, तर व्हॉट्सॲप अपडेट करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. व्हॉट्सॲपने नुकतेच दोन फोनमध्ये एकाच नंबरचे व्हॉट्सॲप वापरता येईल अशी सुविधा ग्राहकांना नुकतीच दिली आहे.
कसे वापराल फीचर?
सर्वप्रथम व्हॉट्सॲप सुरू करा. त्यानंतर सेटिंगमध्ये जा.
सेटिंगमध्ये प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करा.
त्यात कॉल्स ऑप्शनमध्ये जा. तिथे सायलेंट अननोन कॉलरला इनेबल करा.
स्पॅम कॉल्स वाढले
व्हॉट्सॲपवर अनेकांना २५४, ८४, ६३, २१, ६२ आदी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून येणाऱ्या कॉल्सचे प्रमाण बरेच वाढले होते. प्रामुख्याने आफ्रिकी तसेच दक्षिण-पूर्व आशियाई देशांमधून हे कॉल येत होते.
या फीचरमुळे यूजर्सना स्पॅम कॉल म्यूट करता येईल.