जिओनी एम ७ : जाणून घ्या सर्व फिचर्स
By शेखर पाटील | Published: September 26, 2017 11:00 AM2017-09-26T11:00:56+5:302017-09-26T11:02:25+5:30
जिओनी कंपनीने एम ७ हा फुल व्ह्यू डिस्प्लेसह विविध उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
जिओनी एम ७ या मॉडेलमधील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे यातील फुल व्ह्यू डिस्प्ले होय. यात कडा जवळपास नाहीत. हा डिस्प्ले ६.०१ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजे १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आणि १:९ अस्पेक्ट रेशो असणारा २.५ डी या प्रकारातील असेल. यात ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ पी ३० हा गतीमान प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम सहा जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.
जिओनी एम ७ या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशयुक्त ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस एफ/१.८ अपार्चरसह १६ मेगापिक्सल्सचा प्रमुख तर ८ मेगापिक्सल्सचा दुसरा कॅमेरा आहे. यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. या दोन्ही कॅमेर्यांनी काढलेली प्रतिमा ही अतिशय उच्च दर्जाची असेल असा दावा जिओनी कंपनीने केला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यात फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१.१ नोगट आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा अमिगो ५.० हा युजर इंटरफेस असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.
जिओनी एम ७ हे मॉडेल पहिल्यांदा चीनमध्ये १९९९ युऑन (सुमारे २० हजार रूपये) मूल्यात लाँच करण्यात आले आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतासह अन्य बाजारपेठांमध्ये उतारण्याची शक्यतादेखील आहे.