खुशखबर! स्वस्त होणार आहेत 4G Smartphone; 10,000 रुपयांपर्यंतची होऊ शकते कपात
By सिद्धेश जाधव | Published: January 21, 2022 12:07 PM2022-01-21T12:07:26+5:302022-01-21T12:07:55+5:30
4G Smartphone Price In India: यंदा भारतातील 4G स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात होऊ शकते. स्मार्टफोन कंपन्यांच्या निर्णयामुळे ग्राहकांची मोठी बचत होऊ शकते.
4G Smartphone Price In India: स्मार्टफोन्सचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात ऑनलाईन क्लासेस आणि वर्क फ्रॉम होममुळे अनेक घरांतील स्मार्टफोन्सची संख्या वाढली आहे. जरी सर्व गोष्टी सामान्य झाल्या तरी आता निर्माण झालेली ही मागणी काही प्रमाणात कायम राहू शकते. दुसरीकडे गेल्या वर्षभरात स्मार्टफोन कंपन्यांनी देखील आपल्या मोबाईल्सच्या किंमती मोठ्याप्रमाणावर वाढवल्या आहेत. परंतु यंदा यातून ग्राहकांना दिलासा मिळू शकतो.
भारतातील स्मार्टफोन कंपन्या 4G स्मार्टफोन्सच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती नवभारत टाइम्सनं दिली आहे. या मागे सर्वात मोठं कारण 5G असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. यंदा देशात 5G कनेक्टिव्हिटीचा शिरकाव होणार आहे. काही दिवसांपूर्वी सर्वप्रथम नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळणाऱ्या शहरांची यादी देखील समोर आली होती. त्यामुळे लवकरच 4G स्मार्टफोन्सच्या किंमतीत देखील मोठी कपात केली जाऊ शकते.
4G स्मार्टफोन्सची संख्या आणि किंमत होणार कमी
भारतात 5G नेटवर्क लाँच झाल्यावर ग्राहक त्यांच्या स्मार्टफोनवर वेगवान इंटरनेटचा वापर करू शकतील. कॉलिंग आणि अन्य सुविधा देखील सुधारतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे 5G स्मार्टफोन्सची मागणी वाढू शकते. याचा परिणाम 4G स्मार्टफोन्सच्या किंमतीवर होऊ शकतो. यात बजेट सेगमेंटमधील स्मार्टफोन्स 1,000 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतात. तर हायएंड स्मार्टफोन्सच्या किंमतीतील कपात 10,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते.
स्मार्टफोन कंपन्या 4G मोबाईल्सची संख्या देखील कमी करू शकतात. सध्या बाजारात येणारे अनेक मॉडेल्स 5G कनेक्टिव्हिटीसह येत आहेत आणि 5G स्मार्टफोन 4G नेटवर्क देखील चालतो. त्यामुळे कधी कधी थोडे पैसे जास्त देऊन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. अलीकडेच रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं कि, त्यांची कंपनी यंदा अर्ध्या पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन सादर करणार आहे.
हे देखील वाचा:
दिवसभर डेटा पुरत नाही? मग या स्मार्टफोन ट्रिक्स मिळवून देतील तुमचा वाया जाणारा मोबाईल डेटा