एकापेक्षा जास्त डीटीएच कनेक्शन असणाऱ्यांसाठी खुशखबर...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 03:10 PM2019-02-08T15:10:00+5:302019-02-08T16:17:27+5:30
ट्रायने पसंतीचे चॅनल निवडीसाठी नवे नियम 1 फेब्रुवारीपासून अंमलात आणले असले तरीही ज्यांच्या घरामध्ये दोन किंवा जास्त डीटीएच कनेक्शन आहेत ते ग्राहक संभ्रमात आहेत.
मुंबई : ट्रायने पसंतीचे चॅनल निवडीसाठी नवे नियम 1 फेब्रुवारीपासून अंमलात आणले असले तरीही ज्यांच्या घरामध्ये दोन किंवा जास्त डीटीएच कनेक्शन आहेत ते ग्राहक संभ्रमात आहेत. त्यांनाही प्रत्येक कनेक्शनमागे नेटवर्क कॅपॅसिटी फी 130 रुपये भरावी लागेल का, याबाबत साशंकता होती. ट्रायने अशा ग्राहकांसाठी नवीन पॅकेज बनविण्याचे आदेश दिले आहेत.
ट्रायच्या नव्या नियमांनुसार सरसकट 400 चॅनेलऐवजी आता 153 रुपयांत पहिले 100 चॅनेल आणि 0 ते 19 रुपयांच्या किंमतीमध्ये पसंतीचे चॅनेल निवडण्याचा हक्क दिला आहे. यानुसार पसंतीच्या 10-15 चॅनेलचे मासिक शुल्क कमालीचे वाढले आहे. यामुळे आधीच ग्राहकांमध्ये नाराजी आहे. तसेच अनेकजणांकडे दोन किंवा त्यापेक्षा अधिक डीटीएच किंवा केबल कनेक्शन आहेत. अशा ग्राहकांना तर नाहक भुर्दंड भरावा लागत आहे. अशा ग्राहकांसाठी ट्रायने डीटीएच कंपन्यांना नवीन पॅकेज बनविण्यास सांगितले आहे.
या आदेशामुळे दुसऱ्या कनेक्शनसाठी 153 रुपयांची नेटवर्क फी द्यावी न लागण्याची किंवा कमी किंमत आकारली जाण्याची शक्यता आहे. यामुळे या ग्राहकांना फायदा होण्याची शक्यता आहे. डीटीएच कंपन्या अशा ग्राहकांना कॉम्बो ऑफर देऊ शकतात. याबाबतचे आदेश ट्रायचे अध्यक्ष आर एस शर्मा यांनी दिले आहेत.