Goodwill Ransomware: भारतात नव्या व्हायरसचा धुमाकूळ! तुम्हाला कधीही गाठेल, त्याच्या तीन 'चांगल्या' अटी पूर्ण केल्यावरच सोडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 08:55 AM2022-05-23T08:55:21+5:302022-05-23T08:55:49+5:30
डिजिटल धोका कुठे कुठे आणि किती आहे यावर काम करणारी कंपनी क्लाउडसेकने या नव्या रॅन्समवेअरचा शोध लावला आहे.
भारतात एक असा व्हायरस सापडला आहे, जो गरजू मुलांना मदत करण्यासाठी लोकांना खिंडीत गाठू लागला आहे. याला चांगला व्हायरस म्हणायचे की वाईट हे वादातीत असले तरी तो स्मार्टफोन वापरणाऱ्या कोणालाही गाठू शकतो. या शिकार झालेल्या लोकांना तो गरीबांना मदत म्हणून नवीन कपडे, मुलांना पिझ्झा किंवा अन्य गरजेच्या वस्तू, वैद्यकीय उपचार करण्यासाठी पैसे देण्यास भाग पाडतो. यानंतरच तो चोरलेला डेटा सुखरूप परत करतो.
डिजिटल धोका कुठे कुठे आणि किती आहे यावर काम करणारी कंपनी क्लाउडसेकने या नव्या रॅन्समवेअरचा शोध लावला आहे. हा रॅन्समवेअर तुम्हाला वैयक्तिक किंवा कंपनीला हा त्रास देतो. यामुळे फारसे नुकसान जरी सध्या होत नसले तरी कंपनीचे नुकसान होऊ शकते. कंपनीच्या कामकाजावर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच महसुलात घटही होऊ शकते. वैयक्तीक नुकसान म्हणजे, तुमचे पासवर्ड बदलणे किंवा अन्य काही गोष्टी झाल्याने त्रास होऊ शकतो.
या चांगल्या-वाईट व्हायरसचा शोध कंपनीने मार्च २०२२ मध्ये लावला होता. गुडविल रॅन्समवेअर (Goodwill Ransomware) असे या व्हायरसचे नाव आहे. या नावावरूनच हा व्हायरस बनविणारे जे कोणी आहेत ते कथितरित्या सामाजिक न्यायाला मदत मिळावी म्हणून काम करत आहेत. कितीही चांगला मनसुबा असला तरी हा गुन्हा आहे.
गुडविल रॅन्समवेअर हा महत्वाचे फोटो, व्हिडीओ, डेटाबेस तसेच फाईल्स यांच्यापर्यंत पोहोचणे युजरला बंद करून टाकतो. आपला डेटा परत मिळविण्यासाठी लोकांना तीन गोष्टी कराव्या लागतात. बेघरांना कपडे देणे व मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर टाकणे, पाच गरीब मुलांना डॉमिनोझ, पिझ्झा हट सारख्या ठिकाणी घेऊन जाणे आणि त्याचे फोटो पोस्ट करणे तसेच तिसरी अट म्हणजे गरजवंतांना जवळच्या हॉस्पटलमध्ये जाऊन त्यांना आर्थिक मदत देणे आणि त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करून पोस्ट करणे आदी करावे लागते.
यानंतर लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गुडविल रॅन्समवेअरमुळे मी चांगला माणूस बनू शकलो, असे लिहिण्यास सांगितले जाते. एवढे सारे केल्यावर पीडिताला त्याचा डेटा परत केला जातो. क्लाउडसेकला हे कोण करतेय हे देखील समजले आहे, हे एका भारताच्याच आयटी सुरक्षा आणि सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे काम आहे.