ChatGPT ला टक्कर देण्यासाठी Google आणतंय Bard; लवकरच लॉन्च होणार, मिळणार आणखी जबरदस्त फिचर्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 09:37 AM2023-02-07T09:37:40+5:302023-02-07T09:38:30+5:30
ChatGPT चॅटबॉटची वाढती लोकप्रियता गुगलसाठी खूप धोकादायक मानली जात आहे. यातच आता चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी गुगल देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स 'बार्ड' नावाचा चॅटबॉट लॉन्च करण्याची तयारी करत आहे.
ChatGPT चॅटबॉटची वाढती लोकप्रियता गुगलसाठी खूप धोकादायक मानली जात आहे. यातच आता चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी गुगल देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स 'बार्ड' नावाचा चॅटबॉट लॉन्च करण्याची तयारी करत आहे. येत्या काही आठवड्यात हे नवं चॅटबॉट लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याआधी टेस्टर्सचा एक गट 'बार्ड'ची चाचणी करुन पाहणार आहेत.
बार्ड (Bard) हे Google च्या सध्याच्या लँग्वेज मॉडेल LaMDA वर तयार केले गेले आहे. गुगलनं आपल्या सर्च इंजिनसाठी नवीन एआय (AI) टूल्सची घोषणा केली. गुगलचे बॉस सुंदर पिचाई म्हणाले, 'बार्डच्या माध्यमातून आमच्या लँग्वेज मॉडेलची ताकद, बुद्धिमत्ता आणि रचनात्मकता यासह जगातील ज्ञानाची व्याप्ती एकत्रित आणायची आहे'
Google च्या AI सेवा धाडसी आणि जबाबदार असाव्यात अशी आपली इच्छा असल्याचं पिचाई म्हणाले. परंतु त्यांनी 'बार्ड' चुकीची किंवा अपमानकार माहिती सामायिक करणार नाही याबाबत त्यांनी काहीच स्पष्ट केलेलं नाही. बार्ड सुरुवातीला LaMDA च्या लो लेव्हल व्हर्जनवर काम करेल, ज्याला कमी उर्जा लागेल जेणेकरून अधिक लोक ते एकाच वेळी वापरू शकतील.
ChatGPT चा धोका
गेल्या वर्षाच्या अखेरीस, OpenAI ने Microsoft च्या सहाय्यानं ChatGPT हे चॅटबॉट लाँच केले आहे. हे तंत्रज्ञान गुगलच्या सर्च इंजिन व्यवसायासाठी हा एक मोठा धोका मानला जात आहे, कारण ChatGPT चॅटबॉट सर्वात गुंतागुंतीच्या प्रश्नांची एका क्षणात उत्तरं देत आहे. गुगल गेल्या अनेक वर्षांपासून सर्च इंजिन जगतात राज्य करत आहे, पण ChatGPT लवकरच धोक्याची घंटा ठरू शकते हे गुगलच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे कंपनीनंही आता त्या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.
जगभरात ChatGPT ची चर्चा
ChatGPT लॉन्च झाल्यापासून जगभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ChatGPT तुमच्यासाठी निबंध, कोडिंग लिहू शकते, गाणी, कविता इतकंच काय तर कथाही लिहून देऊ शकतो तेही अगदी काही सेकंदात. त्यामुळे या चॅटबॉटनं तंत्रज्ञानाच्या युगात नवी क्रांती घडणार आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळेच जगभर चॅटजीपीटीची जोरदार चर्चा झाली आहे.