गुगलने तुमचा पाठलाग करून अब्जावधी कमावले, आता दणका बसलाच; 7000 कोटी मोजावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 12:33 PM2023-09-15T12:33:26+5:302023-09-15T12:33:47+5:30
गुगलवर नुकताच एक खटला दाखल करण्यात आला आहे. कंपनीवर युजर्सची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तुम्ही कुठे जाता, काय करता, कुठे थांबलाय याची इत्यंभूत माहिती गुगलकडे असते. कारण गुगल तुमचे लोकेशन ट्रॅक करत असते. तुम्ही जे जे काही सर्च करता, बोलता ते ट्रॅक करून तशा जाहिराती तुम्हाला दाखविल्या जातात. त्या भागातील जाहिराती दाखविल्या जातात. तुम्ही गुगलचे ट्रॅकिंग बंद जरी केले तरी तुम्हाला ते ट्रॅक करतच राहतात. गुगलने हे करून आजवर अब्जावधी कोटी कमविले आहेत. परंतू, म्हणतात ना कुठे ना कुठेतरी कर्माची फळे मोजावी लागतात. तसेच झाले आहे.
गुगलवर नुकताच एक खटला दाखल करण्यात आला आहे. कंपनीवर युजर्सची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुगलने कशी आणि कुठे कुठे कोणा कोणाची माहिती, लोकेशन ट्रॅक केले याची माहिती त्यात देण्यात आली आहे. तसेच युजरची दिशाभूल केल्याप्रकरणी गुगलने ७००० कोटींची भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.
कॅलिफोर्नियाचे ऍटर्नी जनरल, रॉब बोन्टा यांनी हा खटला दाखल केला होता. यामध्ये गुगलने लोकेशन ट्रॅकिंग बंद करण्याचा पर्याय निवडला तर आम्ही लोकेशन ट्रॅक करणार नाही असे सांगूनही युजर्सचे लोकेशन ट्रॅक केले, असे आमच्या तपासणीत दिसून आले आहे. गुगल त्याचा आपल्या व्यवसायासाठी फायदा करून घेत आहे. यामुळेच ते लोकेशन ट्रॅक करणे सुरु ठेवतात, असे त्या खटल्यात म्हटले होते.
वृत्तानुसार गुगल यावर सहमत नाहीय. परंतु कंपनीने सेटलमेंट करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. यासाठी $93 दशलक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे. गुगलचे प्रवक्ते जोस कास्टनेडा म्हणाले की, अलिकडच्या वर्षांत केलेल्या सुधारणांनुसार, आम्ही जुन्या उत्पादन धोरणावर आधारित या समस्येचे निराकरण केले आहे. हे आधीच बदलले गेले होते.