Steve Irwin : 'क्रोकोडाइल हंटर' स्टीव्ह यांना गुगलचा डुडलरुपी सलाम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 12:17 PM2019-02-22T12:17:25+5:302019-02-22T12:28:56+5:30
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे.
नवी दिल्ली - गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. गुगलने आज एक खास डुडल तयार करून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे.
स्टीव्ह इरविन यांना 'क्रोकोडाइल हंटर' या नावाने ओळखले जाते. जंगली प्राण्यांना सहज हाताळण्याच्या आपल्या कौशल्यामुळे स्टीव्ह अत्यंत लोकप्रिय झाले होते. पशू-पक्ष्यांशी त्यांची चांगली मैत्री होती. स्टीव्ह यांच्या सन्मानार्थ 15 नोव्हेंबर हा दिवस 'स्टीव्ह इरविन डे' म्हणून साजरा केला जातो. स्टीव्ह हे वन्यजीव संरक्षक, ऑस्ट्रेलियात झू-कीपर म्हणूनही कार्यरत होते. गुगलने तयार केलेल्या आकर्षक डुडलमध्ये स्टीव्ह यांचे पशू-पक्ष्यांबद्दलचे प्रेम दाखवण्यात आले आहे.
स्टीव्ह यांचा जन्म मेलबर्नजवळील एसिडोनमध्ये 22 फेब्रुवारी 1962 रोजी झाला होता. स्टीव्ह यांचे वडील वन्यजीव तज्ज्ञ होते आणि त्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांशी संबंधित हर्पेटोलॉजी विषयात विशेष आवड होती. त्यामुळे स्टीव्ह यांना देखील पशू-पक्ष्यांबद्दल आवड निर्माण झाली. डिस्कव्हरी, अॅनिमल प्लॅनेट, नॅशनल जिओग्राफिक टीव्ही चॅनेलवर इरविन यांचे शो असायचे. मगरींच्या जीवनाशी संबंधित 'क्रोको फाइल्स', 'द क्रोकोडाइल हंटर डायरीज' आणि 'न्यू ब्रीड वेट्स' आदी वाइल्डलाइफ डॉक्युमेंट्री स्टीव्ह यांनी पत्नी टेरी यांच्यासोबत केल्या आहेत.
स्टीव्ह इरविन यांना मगरींविषयी विशेष प्रेम होते. त्यामुळेच ‘क्रोकोडाइल हंटर’ या नावाने ते प्रसिद्ध झाले. अनेक वन्यजीव, पशूंच्या नव्या प्रजातींचाही शोध त्यांनी लावला आहे. स्टीव्ह यांना दोन मुलं असून ते आता वडिलांचा वारसा पुढे चालवत आहेत. ‘द क्रोकोडाइल हंटर’ हा त्यांचा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय झाला. तसेच त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचले. 2006 मध्ये समुद्रातील जीवांवर आधारित एका अंडरवाटर शुटिंगच्या वेळी स्टिंग-रे या माशाने दंश केल्याने स्टीव्ह इरविन यांचा मृत्यू झाला.