कॉफीच्या शोधकर्त्याला गुगलचा डूडलरुपी सलाम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 01:36 PM2019-02-08T13:36:47+5:302019-02-08T16:06:38+5:30
कॉफीचा शोध लावणाऱ्या फ्रेडलिब फर्नेन रंज यांची आज 225 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने कॉफीच्या रंगाचा डुडल तयार करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
नवी दिल्ली - गुगल रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून त्याबाबत माहिती देतं. गुगलने आज एक खास डुडल तयार करून सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
कॉफीचा शोध लावणाऱ्या फ्रेडलिब फर्नेन रंज यांची आज 225 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने कॉफीच्या रंगाचा डुडल तयार करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. गुगलच्या डुडलमध्ये फ्रेडलिब दिसत असून कॉफीच्या रंगात हे खास डुडल तयार करण्यात आले आहे. फ्रेडलिब यांनी स्वतः कॉफीचा कप हातात पकडला असून ते कॉफी पिताना डुडलमध्ये दिसत आहेत. त्यांच्या बाजुला एक मांजरही यात बसलेली दिसत आहे. तसेच कॉफीच्या बियांनी गुगलचा G साकारण्यात आला आहे.
गुगलने फ्रेडलिब यांच्या कार्याची दखल घेत हे खास डुडल तयार केले आहे. जर्मनीमध्ये 8 फेब्रुवारी 1794 रोजी जन्मलेल्या फ्रेडलिब यांनी 1819 रोजी कॉफीचा शोध लावला. 1852 मध्ये एका केमिकल कंपनीच्या मॅनेजरने फ्रेडलिब यांना कामावरून काढून टाकले होते. फ्रेडलिब यांची अखेरपर्यंत आर्थिक परिस्थिती नाजूक राहिली. 25 मार्च 1867 मध्ये वयाच्या 73 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.