लवकरच भारतात मिळणार गुगल होम मिनी स्मार्ट स्पीकर
By शेखर पाटील | Published: March 27, 2018 12:45 PM2018-03-27T12:45:24+5:302018-03-27T12:45:24+5:30
गुगल लवकरच भारतात आपला गुगल होम मिनी हा स्मार्ट स्पीकर लाँच करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. जगभरात स्मार्ट स्पीकर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत.
गुगल लवकरच भारतात आपला गुगल होम मिनी हा स्मार्ट स्पीकर लाँच करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. जगभरात स्मार्ट स्पीकर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. यातच अमेझॉन, अॅपल, गुगल आदींसारख्या कंपन्यांनी या क्षेत्रात उडी घेतल्यामुळे चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमिवर, भारतात लवकरच गुगल होम मिनी हा स्मार्ट स्पीकर सादर करण्यात येईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांच्या माहितीतून समोर आली आहे. साधारणत: एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धान या स्मार्ट स्पीकरसह गुगल कंपनी वाय-फाय मेश राऊटर भारतीय ग्राहकांसाठी सादर करणार आहे. गुगल होम मिनी हे मॉडेल गत ऑक्टोबर महिन्यात कंपनीच्या सानफ्रान्सिस्को शहरात झालेल्या कार्यक्रमात पहिल्यांदा प्रदर्शीत करण्यात आले होते. यानंतर अमेरिकेसह काही राष्ट्रांमध्ये याला लाँच करण्यात आले आहे. आता हाच स्मार्ट स्पीकर भारतीय ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. याचे मूल्य ३ हजार रूपयांच्या आसपास राहू शकते.
गुगल होम मिनी हे मॉडेल आकाराने अतिशय आटोपशीर असेच आहे. याला गुगल क्रोमकास्टचा सपोर्ट देण्यात आला आहे. याच्या मदतीने यावर स्ट्रीमिंगचा आनंद घेता येणार आहे. तसेच क्रोमकास्ट हे इनबिल्ट अवस्थेत असणार्या उपकरणाशी ते सहजपणे कनेक्ट होणार आहे. यात गुगल असिस्टंटवर आधारित व्हाईस कमांडचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे कुणीही ओके गुगल वा हे गुगल म्हणून याला विविध आज्ञावली देऊ शकतो. याच्या मदतीने कुणीही घरातील स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करून याच्या विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करू शकतो. यात काही विशिष्ट फिचर्सदेखील देण्यात आले आहेत. यातील लक्षणीय म्हणजे ब्रॉडकास्ट हे होय. याच्या अंतर्गत कुणीही गुगल होम मिनी या मॉडेलसमोर एखादा संदेश बोलल्यास तो घरातील सर्व खोल्यांमध्ये ऐकता येईल. अर्थात कुणीही अन्य खोल्यांमध्ये असणार्या आपल्या कुटुंबियांना सुलभपणे संदेश पाठवू शकतो. तर बच्चे कंपनीच्या मनोरंजनासाठी गुगलने डिस्नेशी करार केला आहे. यामुळे हा स्पीकर मुलांना विविध बालकथा ऐकवू शकेल. सर्वात महत्वाची म्हणजे गुगलच्या नेस्ट या प्रणालीशी गुगल होम मिनी हा सहजपणे कनेक्ट होणार आहे. तसेच याच्या मदतीने घरात वा घराबाहेर असणारे सिक्युरिटी कॅमेरे चालू आहेत की नाही? याची माहितीदेखील मिळणार आहे. एका अर्थाने गुगलने अत्यंत किफायतशीर दरात उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा हा स्मार्ट स्पीकर भारतीय ग्राहकांना सादर करण्याचे संकेत दिले आहेत. हे मॉडेल अमेझॉनच्या इको डॉट या स्मार्ट स्पीकरला तगडे आव्हान देण्याची शक्यता आहे.
पाहा: गुगल होम मिनी स्मार्ट स्पीकरची कार्यप्रणाली दर्शविणारा व्हिडीओ