गुगल प्लस गेले, Shoelace आले; सोशल मीडियामुळे लोकांशी आलेला दुरावा घटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 12:50 PM2019-07-16T12:50:12+5:302019-07-16T12:52:37+5:30
सोशल मीडियाने जग जवळ आले आहे. मात्र, लोकांमध्ये अंतरही खूप वाढले आहे.
गुगलनेफेसबुकमुळे ऑर्कुटला वाईट दिवस आल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा प्रस्थान बसविण्याचा प्रयत्न केला होता. Google+ लाँच करत गुगलनेफेसबुक, ट्विटरला धक्का द्यायचा प्रयत्न करूनही अपयश आल्याने गेल्यावर्षी गुगल प्लस बंद करण्यात आले होते. आता गुगलने पुन्हा नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणला असून थोडासा वेगळा विचार केला आहे.
सोशल मीडियाने जग जवळ आले आहे. मात्र, लोकांमध्ये अंतरही खूप वाढले आहे. पूर्वी लोक एकमेकांना भेटत होते. आता सोशल मीडियामुळे दुरावले आहेत. ही खंत लक्षात घेऊन गुगलने हे शूलेस हे नवीन अॅप आणले आहे. या अॅपद्वारे खऱ्या आयुष्यात माणसे जोडण्यात येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. गुगलची टीम 120 ने हे अॅप बनविले आहे.
या अॅपमध्ये तुमच्या खासगी आवड-निवडींवरून मित्र-मैत्रिणींचा शोध घेतला जातो. उदा. जर तुम्ही कोणत्याही नवीन शहरात राहायला गेला असाल आणि तेथे मित्र बनवू इच्छित असाल तर शूलेसच्या वापराने हे करता येणार आहे.
Shoelace वेबसाईटनुसार या अॅपमध्ये खासगी आयुष्याचे भान ठेवण्यात आले आहे. हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर प्रत्येक युजरला कम्युनिटी जोडण्यासाठी सांगण्यात येते. यासाठी पडताळणीची गरज असते. हे अॅप सध्या अमेरिकेतच लाँच केले आहे आणि इन्व्हाईट केल्यानंतरच या सोशल मीडियावर जाता येणार आहे.
हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरता येणार आहे. मात्र, त्यासाठी गुगलवर खाते असणे गरजेचे आहे. गुगल प्लस बंद केल्यानंतर हे नवीन अॅप लाँच करण्यात आले आहे. गुगल प्लसमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षेची कमतरता होती.