Google Layoffs 2023: माणसांनंतर आता रोबोटही झाले बेरोजगार; Google ने केली इतक्या Robot ची हक्कालपट्टी...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 02:54 PM2023-02-26T14:54:01+5:302023-02-26T14:54:59+5:30
Google Layoffs 2023: गेल्या काही महिन्यांपासून आयटी क्षेत्रात नोकरकपातीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.
Google Layoffs News : गेल्या काही महिन्यांपासून आयटी क्षेत्रात नोकरकपातीचे (Layoffs) सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. Google ची मूळ कंपनी Alphabet ने पुन्हा एकदा नोकरकपात केली आहे. विशेष म्हणजे या वेळी माणसांची कपात नाही, तर रोबोट्सची कपात करण्यात आली आहे. होय, अमेरिकन टेक कंपनीने 100 रोबोट्सना कामावरुन काढले आहे.
रोबोट्सची हकालपट्टी
रिपोर्ट्सनुसार अल्फाबेटचा एव्हरीडे रोबोट्स प्रोजेक्ट बंद करण्यात आला आहे. याआधी या दिग्गज सर्च इंजिन कंपनीने जवळपास 12 हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. एव्हरीडे रोबोट्स प्रकल्प हे Google च्या एक्सपेरिमेंटल एक्स लॅबोरेटरीज अंतर्गत एक युनिट होते, जे अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई (Sunder Pichai) यांनी बंद केले आहे. या अंतर्गत 100 रोबोट्सना प्रशिक्षण देण्यात आले होते. हे चाक असलेले रोबोट कंपनीच्या कॅफेटेरियाची साफसफाई करण्यास मदत करायचे.
रोबोट हे काम करायचे
यापैकी बरेच रोबोट प्रोटोटाइप प्रयोगशाळेच्या बाहेर पाठवले गेले आहेत आणि ते Google बे एरियामध्ये चांगले काम करत आहेत. टेबल साफ करणे, कचरा वेगळा करणे आणि रीसायकल करण्यासाठी या रोबोट्सचा वापर करण्यात आला. कोरोना महामारीच्या काळात कॉन्फरन्स रूम स्वच्छ करण्यासाठीही या रोबोट्सची मदत घेण्यात आली होती. रोबोट डिव्हिजन बंद केल्यानंतर त्याचे तंत्रज्ञान अन्य काही विभागात काम करतील.
रोबोटची जगभरात लोकप्रियता
अल्फाबेटने गेल्या काही वर्षांपासून शिकण्यासाठी इंटिग्रेटेड हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सिस्टिम विकसित केली आहे. याद्वारे कंपनीला व्हर्चुअल जगातून खऱ्या जगात ज्ञान हस्तांतरित करायचे आहे. रोबोट्सही जगभरात लोकप्रिय होत आहेत. मानव त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामे करुन घेत असतात. मशीन लर्निंग टेक्निक, रीइन्फोर्समेंट लर्निंग, प्रात्यक्षिक यासारख्या गोष्टींद्वारे हे करणे शक्य आहे.
गुगलची विचित्र ऑर्डर
तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या परिस्थिती ठीक नाहीये. एकामागून एक कंपन्या कर्मचाऱ्यंची कपात करत आहेत. तोट्याचा सामना करत असलेल्या टेक कंपन्या खर्च कमी करण्यासाठी विविध पर्याय शोधत आहेत. गुगलने कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांनाही खर्च कमी करण्यासाठी सहकाऱ्यांसोबत डेस्क शेअर करण्यास सांगितले आहे.