Google मध्ये मोठी कर्मचारी कपात, 12000 लोकांच्या रोजी-रोटीवर संकट!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 08:56 PM2024-01-11T20:56:31+5:302024-01-11T20:57:14+5:30
गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे.
जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगल (Google) चालवणारी मूळ कंपनी अल्फाबेट इंक (Alphabet Inc.) ने नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक मोठी घोषणा केली आहे. गुगलमध्ये मोठी कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे जवळपास 12,000 लोकांच्या नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे. गुगलने खर्च कमी करण्यासाठी आपल्या विविध विभागांमध्ये कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
गुगलने एका निवेदनात म्हटले आहे की, खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हार्डवेअर, व्हॉईस असिस्टंट आणि इंजिनिअरिंग टीममध्ये काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गुगल कंपनीला आपल्या सर्वोच्च प्राधान्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे ही कर्मचारी कपात करण्यात आली आहे. याशिवाय, कंपनी 'भविष्यात महत्त्वाच्या संधींमध्ये योग्य गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे.'
याचबरोबर, आमच्या काही टीम्समध्ये स्ट्रक्चरल बदल करत आहेत, ज्यात जगभरातील काही पदे काढून टाकण्याचा समावेश असू शकतो, असे गुगलने म्हटले आहे. दरम्यान, गुगलने याआधी सांगितले होते की, ते फक्त काही शंभर पदे काढून टाकत आहेत, ज्याचा परिणाम अॅडव्हॉन्स हार्डवेअर टीमवर होईल. गुगल आणि तिची मूळ कंपनी अल्फाबेटने खर्च कमी करण्याचे मार्ग ठरवल्यानंतर ही कर्मचारी कपात करण्यात आली आहे.
गेल्यावर्षी गुगल कंपनीने 6 टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजेच जवळपास 12,000 लोकांना कामावरून काढून टाकणार असल्याचे सांगितले होते. दुसरीकडे, या आठवड्याच्या सुरुवातीला अॅमेझॉन कंपनीने आपल्या प्राइम व्हिडिओ आणि स्टुडिओ युनिट्समधील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तसेच, कंपनी आपल्या लाइव्हस्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ट्विचवर काम करणाऱ्या सुमारे 500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची कंपनीची योजना आहे.
दरम्यान, गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. कंपनीचे मोबाईल फोन सॉफ्टवेअर अँड्रॉइड जगभरात लोकप्रिय आहे. याशिवाय कंपनीच्या जीमेल, यूट्यूब आणि मॅप्स सर्व्हिसच्या युजर्सची संख्या कोट्यवधींमध्ये आहे.