Hybrid Work Culture: आठवड्यातून ३ दिवसचं ऑफिसला जाणार Google चे कर्मचारी; पूर्ण 'वर्क फ्रॉम होम'चाही पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 03:57 PM2021-05-06T15:57:16+5:302021-05-06T16:00:58+5:30
Google Hybrid Work Culture : अनेक कंपन्यांकडून नव्या हायब्रिड कल्चरचा करण्यात येत आहे वापर.
Hybrid Work Culture: सध्या जगभरात कोरोनाच्या महासाथीनं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारला आहे. अनेक कंपन्या नव्या हायब्रिड मॉडेलचा वापी करत आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना काही दिवस ऑफिसमध्ये तर काही दिवस वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google नंदेखील या मॉडेलचा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Google आणि Alphabet चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसंच गुगलचे कर्मचारी आठवड्याचे तीन दिवस ऑफिसमधून आणि दोन दिवस आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणाहून काम करू शकतात असं त्यांनी म्हटलं आहे. या वर्षाच्या अखेरिस ऑफिस उघडल्यानंतरही कंपनीचे २० टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम सुरूच ठेवतील आणि काही कर्मचारी आठवड्याचे काही दिवस ऑफिसमधून काम सुरू ठेवतील. पूर्ण वेळ घरून काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अर्ज करावा लागणार असल्याचंही पिचाई यांनी नमूद केलं आहे.
कोणत्याही कर्मचाऱ्याला आठवड्यातील तीन दिवसांपेक्षा अधिक काळ ऑफिसमध्ये राहावं लागू शकतं. तसंच प्रोडक्ट एरिया आणि फंक्शन्सच्या आधारावर याचा निर्णय घेतला जाईल की कोणती टीम कोणत्या दिवशी ऑफिसमध्ये राहिली. कर्मचाऱ्यांना कंपनी त्यांची भूमिका आणि टीमची गरज यानुसार आठवड्याचे पाच दिवस वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी देईल. परंतु यासाठी अर्ज करावा लागणार आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर गुगलचे कर्मचारी वर्षातील चार आठवडे आपल्या मुख्य कार्यालयापासून अन्य ठिकाणाहूनही काम करू शकतील, असंही त्यांनी नमूद केलं आहे. सध्या गुगलमध्ये एकूण १ लाख ३९ हजार ९९५ कर्मचारी कार्यरत आहेत. तर एका अंदाजानुसार भारतातही गुगलचे चार हजार कर्मचारी आहेत. भारतात गुगलची मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि गुरुग्राममध्ये कार्यालये आहेत.