'त्या' नंबरवर कॉल केला अन् तब्बल 1 लाख गमावले; वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 04:18 PM2019-11-25T16:18:54+5:302019-11-25T16:24:35+5:30
ऑनलाईन व्यवहार हे मोठ्या प्रमाणात केले जातात. मात्र यामुळे फ्रॉड होण्याची शक्यता ही अधिक असते.
नवी दिल्ली - ऑनलाईन व्यवहार हे मोठ्या प्रमाणात केले जातात. मात्र यामुळे फ्रॉड होण्याची शक्यता ही अधिक असते. गुगल पे वापरणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. महिलेच्या बँक खात्यातून तब्बल एक लाख रुपये चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुगल पेच्या माध्यमातून फसवणूक होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. हॅकिंगचा फटका हा अनेकांना बसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुगल पेच्या माध्यमातून महिलेच्या बँक खात्यातून एक लाख चोरीला गेले आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. महिलेने दिल्लीतील एका गुरुद्वाराच्या बुकिंगसाठी कॉल केला होता. गुगलवर सर्च करून मिळालेल्या फोननंबरवर महिलेने फोन केला. त्यावेळी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने गुरुद्वाराची बुकिंग ही ऑनलाईन करण्यात आली असून त्याच्यासाठी पेमेंट हे गुगल पेच्या मदतीने करावं लागेल असं सांगितलं.
फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने महिलेला एक लिंक पाठवली. या लिंकवर क्लिक करून गुरुद्वारा बुक करण्यासाठी एक फॉर्म भरुन देण्यास सांगितलं. फॉर्म भरुन दिल्यानंतर महिलेने सुरुवातीला 5 रुपये ट्रान्सफर केले. बुकिंग प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महिलेला फोन होल्ड करण्यास सांगितलं. यानंतर काही वेळातच महिलेला मेसेज येण्यास सुरुवात झाली. फोन चेक केल्यावर महिलेला तिच्या बँक खात्यातून तब्बल एक लाख रुपये काढल्याचं लक्षात आलं. फसवणूक झाल्याचं समजताच महिलेने तातडीने बँकेशी संपर्क केला. तसेच तक्रार नोंदवली.
हॅकिंगच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हॅकर्स अत्यंत शिताफीने युजर्सचा डेटा चोरत आहेत. यामुळे युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र आता हॅकिंगपासून वाचण्यासाठी गुगलनेच एक नवा सल्ला दिला आहे. स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर गुगल क्रोमचा वापर केला जातो. त्यामुळे गुगलने आता सर्व क्रोम युजर्सना आपलं ब्राऊजर अपडेट करायला सांगितलं आहे. तसेच युजर्स क्रोमच्या लेटेस्ट व्हर्जनचा वापर करतील. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, क्रोमसाठी एक फिक्स रोलआऊट केलं आहे. ज्याच्या मदतीने युजर्स हॅकिंगपासून वाचू शकतात. ब्राऊजर अपडेट न केल्यास हॅकर्स युजर्सचं डिव्हाईस हॅक करू शकतात. गुगल क्रोमच्या या अपडेटच्या माध्यमातून जीरो डे वल्नरबिलिटी ठिक केली असल्याची माहिती डिजिटल ट्रेंड्सने दिली आहे. जुने व्हर्जन असलेल्या क्रोम बाऊजरवर हॅकिंगचं सावट आहे.