गुगलचं लवकरच नवं अॅप येणार; TikTok ला टक्कर देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 12:31 PM2019-10-06T12:31:04+5:302019-10-06T12:40:01+5:30
टिक टॉकला टक्कर देण्यासाठी लवकरच गुगलचं नवं अॅप येणार आहे.
नवी दिल्ली - टिक टॉक या अॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. टिक टॉकला टक्कर देण्यासाठी लवकरच गुगलचं नवं अॅप येणार आहे. गुगल अमेरिकेतील लोकप्रिय सोशल व्हिडीओ शेअरिंग अॅप 'फायरवर्क' खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत. स्ट्रीट जर्नलने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुगलबरोबरच चीनची प्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट Weibo सुद्धा फायरवर्क खरेदी करण्याच्या विचारात आहेत. मात्र, फायरवर्क खरेदी करण्याच्या शर्यतीत गुगल इतर कंपन्यांच्या पुढे आहे.
फायरवर्कने गेल्या महिन्यात भारतात एन्ट्री केली आहे. फंड रेजिंगमध्ये फायरवर्कला या वर्षाच्या सुरूवातीला 100 मिलियन डॉलर नफा प्राप्त झाला आहे. तर, टिक टॉकची सहयोगी कंपनी बाइटडान्सनं 75 मिलियन डॉलर आहे. फायरवर्क लूप नाउ टेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या अॅप्सचा एक हिस्सा आहे. शॉर्ट व्हिडिओ मोकिंग आणि शेअरिंगसाठी असलेले हे अॅप टिक टॉकपेक्षा वेगळं आहे.
फायरवर्क युजर्स 30 सेकंदाचा व्हिडीओ बनवू शकतात. टिक टॉकमध्ये फक्त 15 सेकंदापर्यंत व्हिडिओ बनवता येतो. व्हर्टिकल व्हिडीओसोबतच हॉरिजॉन्टल व्हिडीओसुद्धा शूट करू शकतो. फायरवर्क अॅप अँड्रॉईड आणि आयओएस युजर्ससाठी उपलब्ध आहे. हे अॅप वापरणाऱ्या युजर्सची संख्या 10 लाखांपेक्षा अधिक आहे. भारतातही फायरवर्क अॅपला चांगला प्रतिसाद मिळेल असा कंपनीने दावा केला आहे.
सोशल मीडिया कंपनी फेसबुकने देखील युजर्समध्ये शॉर्ट व्हिडिओ मेकिंगची वाढलेली क्रेझ लक्षात घेऊन एक नवं अॅप लाँच केलं आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात Lasso नावाचं एक अॅप फेसबुकनं लाँच केलं आहे. नव्या व्हिडीओ अॅपमध्ये फेसबुकने अनेक मजेदार फिल्टर्स आणि इफेक्ट्सचा समावेश केला आहे. यामुळे युजर्स अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हवे तसे मजेदार व्हिडीओ तयार करु शकतात. तसेच अॅपच्या माध्यमातून युजर्स एक छोटा मजेशीर व्हिडीओ झटपट तयार करून सोशल मीडियावर तो शेअर करू शकतात. युजर्स आपल्या व्हिडीओमध्ये एडिटींग टूलच्या मदतीने टेक्स्ट आणि म्युझिकचाही वापर करू शकतात. हेच या अॅपचं वैशिष्ट्य आहे.