नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 06:53 PM2024-09-30T18:53:10+5:302024-09-30T18:53:48+5:30
गुगलने या कर्मचाऱ्याकडे आपल्या एका महत्वकांशी प्रोजेक्टची जबाबदारी दिली आहे.
Google Paid $2.7 Billion To Rehire AI Expert : टेक इंडस्ट्रीतील दिग्गज कंपनी Google ने आपल्या एका माजी कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेतले आहे. विशेष म्हणजे, यासाठी कंपनीला मोठी रक्कम मोजावी लागली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस(Ai) जीनियस म्हटल्या जाणाऱ्या या व्यक्तीचे नाव नोम शजिर आहे. गुगलवर रागावून त्याने नोकरीचा राजीनामा दिला होता. आता गुगलने त्याला पुन्हा कामावर घेण्यासाठी तब्बल 2.7 बिलियन डॉलर्स, म्हणजेच सुमारे 22 हजार कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.
48 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर Noam Shajir ने 2000 साली गुगलमध्ये नोकरीला सुरुवात केली. जवळपास 20-21 वर्षे कंपनीत काम केल्यानंतर नोमने 2021 मध्ये कंपनीला राम-राम ठोकला. नोमने Google कडे चॅटबॉट जारी करण्याची विनंती केली होती, पण कंपनीने ती नाकरली. याचाच राग मनात धरुन त्याने कंपनी सोडली आणि मित्र डॅनियल डी फ्रेटाससोबत Character.AI नावाचा नवीन स्टार्टअप सुरू केला.
त्यांची ही कंपनी सिलिकॉन व्हॅलीतील सर्वात चमकदार कामगिरी करणाऱ्या स्टार्टअप्सपैकी एक बनली. दरम्यान, आता Google ने त्यांचे AI युनिट DeepMind मध्ये सामील करण्याची घोषणा केली आहे. यासाठी नोम शजिरच्या Character.AI चे तंत्रज्ञान कामी येणार असल्यामुळे गुगलने शजिरला परत कंपनीत काम करण्याची ऑफर दिली. यासाठी कंपनी नोमला तब्बल $2.7 अब्ज देणार आहे.
या कारणास्तव गुगल सोडले
2017 मध्ये नोमने मीना नावाचा एक अतिशय प्रगत चॅटबॉट विकसित केला होता. हा अनेक समस्या सोडवू शकत होता. त्याने हा चॅटबॉट सुरू करण्याची कंपनीकडे विनंती केली. पण, त्यावेळी गुगलच्या उच्च व्यवस्थापनाने त्याची विनंती अमान्य केली. यामुळे नाराज झालेल्या शजिरने कंपनी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
शजिर आता गुगलसाठी काय करणार?
Google मध्ये परतल्यानंतर शजिर कंपनीच्या Gemini Ai चे पुढील व्हर्जन तयार करणाऱ्या टीमचे नेतृत्व करेल. OpenAI च्या ChatGPT सारख्या प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्यासाठी Google ने Gemini AI तयार केले आहे. आता शजिर याचे नेतृ्त्व करणार आहे.