गुगल खरेदी करणार एचटीसीचे स्मार्टफोन उत्पादनाचे युनिट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 10:49 AM2017-09-11T10:49:02+5:302017-09-11T10:51:10+5:30
गुगल एचटीसी कंपनीचे स्मार्टफोन उत्पादनाचे युनिट खरेदी करणार असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.
एचटीसी ही तैवानमधील कंपनी स्मार्टफोन उत्पादनातील अग्रगण्य नाव म्हणून गणली जाते. आपल्या दोन दशकांच्या वाटचालीत या कंपनीने अनेक विक्रम प्रस्थापित केले. यात जगातील पहिला स्मार्टफोन, पहिला अँड्रॉईड प्रणालीवर चालणारा स्मार्टफोन तसेच पहिला टचस्क्रीन स्मार्टफोन उत्पादीत करण्याचे श्रेय या कंपनीला जाते. मात्र अलीकडच्या काळात या कंपनीची कामगिरी मोठ्या प्रमाणात ढेपाळल्याचेही दिसून आले. विशेष करून सॅमसंग, अॅपल, एलजी, सोनी आदींसारख्या प्रस्थापित ब्रँडसोबत चिनी कंपन्यांनी अतिशय उत्तमोत्तम स्मार्टफोन सादर करून एचटीसीला आव्हान दिले. गेल्या वर्षभरात तर एचटीसीच्या विक्रीत तब्बल ५४ टक्क्यांनी घट आल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या एचटीसी यु ११ या मॉडेलला ग्राहकांची पसंती मिळूनही झालेली ही घसरगुंडी कंंपनीच्या चिंतेचे प्रमुख कारण बनले आहे. या पार्श्वभूमीवर एचटीसीचे स्मार्टफोन उत्पादन करणारा विभाग गुगल खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे डील आता अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.
खरं तर गुगल आणि एचटीसी कंपन्यांचे संबंध जुने आहेत. एचटीसीने गुगलच्या पिक्सल स्मार्टफोनचे उत्पादनही केले आहे. या पार्श्वभूमीवर गुगलचे हे संभाव्य अधिग्रहण टेकविश्वात कुतुहलाचा विषय बनले आहे. अॅपल आणि सॅमसंगप्रमाणे स्वतंत्र हार्डवेअर असणारे स्मार्टफोन उत्पादीत करण्याचा प्रयत्न गुगलने मोटोरोला कंपनीला खरेदी करून करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यात फारसे यश आले नाही. यामुळे स्मार्टफोन उत्पादनात गुगल दुसरी इनिंग सुरू करण्यासाठी एचटीसीचा उपयोग करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच एचटीसीच्या उच्च दर्जाच्या हार्डवेअरला अँड्रॉइडची जोड देण्याचा गुगलचा प्रयत्न असल्याचेही यातून अधोरेखित झाले आहे. विशेष बाब म्हणजे या सौद्यात व्हाईव्ह या एचटीसीच्या व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेटचा समावेश नसेल. या युनिटची मालकी एचटीसीकडेच राहणार असल्याचे वृत्त आहे.