आयफोनला टक्कर देण्यासाठी गुगल मैदानात, पिक्सल 2 व पिक्सल 2 एक्सएल करणार लाँच

By शेखर पाटील | Published: September 18, 2017 08:39 AM2017-09-18T08:39:24+5:302017-09-18T08:39:44+5:30

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या आयफोनच्या विविध मॉडेल्सला टक्कर देण्यासाठी गुगल कंपनीने कंबर कसली असून पुढील महिन्यात पिक्सल २ व पिक्सल २ एक्सएल हे फ्लॅगशीप स्मार्टफोन लाँच करण्याचे जाहीर केले आहे.

google set to launch pixel 2 and pixel 2 xl | आयफोनला टक्कर देण्यासाठी गुगल मैदानात, पिक्सल 2 व पिक्सल 2 एक्सएल करणार लाँच

आयफोनला टक्कर देण्यासाठी गुगल मैदानात, पिक्सल 2 व पिक्सल 2 एक्सएल करणार लाँच

स्मार्टफोनच्या जागतिक बाजारपेठेत सध्या उच्च श्रेणी म्हणजेच फ्लॅगशीप या प्रकारात प्रचंड घडामोडी होत आहेत. सॅमसंगने गॅलेक्सी नोट ८ हे मॉडेल सादर केल्यानंतर अ‍ॅपल कंपनीने आयफोनचे तीन नवीन मॉडेल्स लाँच केले आहेत. या पाठोपाठ आता गुगल कंपनीनेदेखील या स्पर्धेत उडी घेण्याचे संकेत दिले आहेत. गुगल कंपनी ४ ऑक्टोबर रोजी पिक्सल्स २ व पिक्सल्स २ एक्सएल हे दोन मॉडेल सादर करणार असून याचा युट्युबवरील एका व्हिडीओच्या माध्यमातून टिझरदेखील जारी करण्यात आला आहे. यात गुगलच्या सर्च बारमध्ये स्मार्टफोनबाबत विविध प्रश्‍नांना दर्शविण्यात आले आहेत. यात स्मार्टफोनची बॅटरी, स्टोअरेज, ऑटो अपडेट, कॅमेर्‍यातून काढलेल्या प्रतिमांची क्वॉलिटी आदींना अधोरेखित करण्यात आले आहे. व्हिडीओच्या शेवटी ४ ऑक्टोबर ही दिनांक दर्शविण्यात आली आहे. यामुळे याच दिवशी म्हणजे ४ ऑक्टोबर रोजी पिक्सल २ व पिक्सल २ एक्सएल हे दोन नवीन फ्लॅगशीप मॉडेल्स लाँच होण्याची शक्यता असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हे दोन्ही स्मार्टफोन गत वर्षी लाँच करण्यात आलेल्या पिक्सल आणि पिक्सल एक्सएल या मॉडेल्सची अद्ययावत आवृत्ती असेल.

गुगल कंपनीने जारी केलेल्या व्हिडीओतील विविध मुद्यांनुसार विचार केला असता, पिक्सल २ व पिक्सल २ एक्सएल या मॉडेल्समध्ये अतिशय दर्जेदार बॅटरी, वाढीव स्टोअरेज, चांगल्या प्रतिचा कॅमेरा असण्याची शक्यता आहे. गुगल कंपनीचा गुगल असिस्टंट हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंटदेखील नवीन मॉडेलमध्ये असण्याची शक्यता आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही स्मार्टफोनमध्ये गेल्या महिन्यात लाँच करण्यात आलेली गुगलची अँड्रॉइड ओरिओ (ओ) ही आवृत्ती असेल. अर्थात अँड्रॉइड ओ या आवृत्तीवर हे दोन्ही स्मार्टफोन चालतील हे आता स्पष्ट झाले आहे.

याआधी अनेक लीक्समधील पिक्सल २ व पिक्सल २ एक्सएल या दोन्ही मॉडेल्समधील बरेचसे फिचर्स जगासमोर आले आहेत. यातील पिक्सल २ हे मॉडेल एचटीसी तर पिक्सल २ एक्सएल हे मॉडेल एलजी कंपनी उत्पादीत करणार आहे. यातील पहिल्या मॉडेलच्या समोरील बाजूस बूमसाऊंड स्टिरिओ स्पीकर देण्यात आलेले असतील. यात एजसेन्स हे फिचरदेखील असेल. तर दुसरे मॉडेल हे अत्यंत आकर्षक डिझाईनयुक्त असेल. दरम्यान, पिक्सल २ व पिक्सल २ एक्सएल या मॉडेल्सच्या आगमनाआधी गुगल कंपनीने आपल्या पिक्सल आणि पिक्सल एक्सएल या दोन्ही मॉडेल्सच्या किंमती घटविल्या असून यासोबत आपला डेड्रीम हा व्हिआर हेडसेट देण्याचेही घोषीत केले आहे.

Web Title: google set to launch pixel 2 and pixel 2 xl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.