गुगलचा लवकरच टचस्क्रीनयुक्त स्मार्ट स्पीकर
By शेखर पाटील | Published: October 25, 2017 12:27 PM2017-10-25T12:27:15+5:302017-10-25T12:28:23+5:30
गल टचस्क्रीन डिस्प्ले असणारा स्मार्ट स्पीकर तयार असल्याचे सोर्स कोडद्वारे स्पष्ट झाले असून यात युट्युब प्ले-बॅकसह विविध उपयुक्त फिचर्स असतील. काही दिवसांपूर्वीच गुगल टचस्क्रीनने युक्त असणारा स्मार्ट स्पीकर तयार करणार असल्याची माहिती समोर आली होती.
गुगल टचस्क्रीन डिस्प्ले असणारा स्मार्ट स्पीकर तयार असल्याचे सोर्स कोडद्वारे स्पष्ट झाले असून यात युट्युब प्ले-बॅकसह विविध उपयुक्त फिचर्स असतील. काही दिवसांपूर्वीच गुगल टचस्क्रीनने युक्त असणारा स्मार्ट स्पीकर तयार करणार असल्याची माहिती समोर आली होती.
अँड्रॉइड पोलीस या टेक पोर्टलच्या ताज्या वृत्ताने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गुगल च्या आगामी एपीके फाईलमधील अॅपच्या सोर्स कोडचे अध्ययन केले असता टचस्क्रीनयुक्त स्मार्ट स्पीकरची माहिती यात आढळून आल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे. यात क्वार्टझ या नावाने नवीन उपकरण येणार असल्याचे दिसून आले आहे. (याचे प्रयोगात्मक स्थितीतील सांकेतिक नाव प्रोजेक्ट मॅनहॅटन असल्याची माहिती आधी समोर आली होती.) यात या उपकरणाचे विविध मेन्यू आणि फिचर्सची माहितीदेखील यात देण्यात आली आहे. यानुसार यात ३२ विविध ऑन स्क्रीन आयकॉन्ससह हवामानाचे अलर्ट देण्यात येतील असे दिसून आले आहे. यात युट्युब प्लेबॅकचा सपोर्ट असेल. यावरून कुणीही वेब सर्फींग करू शकेल. तसेच यात बिझनेस लिस्टींग, फोटो गॅलरीज आणि गुगल मॅप्सची सुविधाही यात असेल असे या वृत्तात म्हटले आहे.
यात सात इंच आकारमानाचा टचस्क्रीन डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. तसंच यामध्ये अॅड्रॉइड आणि आयओएस या प्रणालींचा सपोर्ट असेल. याच्या मदतीने कंपन्या आपापले थर्ड पार्टी अॅप्लीकेशन्सदेखील तयार करू शकतील. विशेष म्हणजे यात गुगल नेस्टसारख्या स्मार्ट होम प्रणालींशी कनेक्ट होण्याची सुविधा असेल. यामुळे घरातील विविध स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करण्यासाठी हब म्हणून हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे.
अमेझॉन इको या उपकरणाला टक्कर देण्यासाठी गुगल या माध्यमातून प्रयत्न करण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे सारे होत असतांना लिंकी या स्टार्टपने इनबिल्ट गुगल असिस्टंट असणारा याच प्रकारातील अर्थात टचस्क्रीन डिस्प्लेयुक्त स्मार्ट स्पीकर सादर केला आहे.