सिम कार्डविना कॉल, इंटरनेट आणि मेसेज करता येणार? अँड्रॉइडमध्ये मिळू शकतं भन्नाट फिचर
By सिद्धेश जाधव | Published: April 4, 2022 03:07 PM2022-04-04T15:07:31+5:302022-04-04T15:07:40+5:30
Google सध्या एका नवीन फीचरवर काम करत आहे, जे Android 13 ऑपरेटिंग सिस्टममध्ये मिळू शकतं.
स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड असेल तरच त्याचा वापर कॉलिंग, मेसेजिंग आणि इंटरनेट वापरण्यासाठी करता येतो. परंतु तुम्हाला माहित आहे का सुरुवातीला मोबाईल्समध्ये सिमकार्ड बिल्ट-इन दिले जायचे? वेगळं कार्ड विकत घेऊन ते एखाद्या स्लॉटमध्ये टाकावं लागत नसे. आणि आता पुन्हा एकदा तेच दिवस परत येणार असं दिसत आहे. सध्या आयफोनमध्ये मिळणार फिचर लवकरच अँड्रॉइडमध्ये देखील बघायला मिळेल.
गुगल करत आहे काम
गुगल दरवर्षी आपल्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टममध्ये बदल करत असते. आता असाच एक मोठा बदल Android 13 च्या माध्यमातून अँड्रॉइड युजर्सच्या सेवेत दाखल होऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, गुगल एका अशा फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड स्लॉट देण्याची गरज भासणार नाही. Multiple Enabled Profiles (MEP) नावाचं फिचर लवकरच Android 13 मध्ये दिसू शकतं.
या फीचरमुळे दोन टेलिकॉमच्या सुविधा सिंगल ई-सिममध्ये वापरता येतील. तसेच हवं तेव्हा या ऑपरेटर्समध्ये तुम्ही स्विच करू शकता. सध्या ई-सिम कार्डमध्ये फक्त एकच ऑपरेटर वापरता येत आहे. त्यामुळे ड्युअल सिम सपोर्टसाठी मल्टीपल ई-सिम कार्ड, ड्युअल फिजिकल सिम कार्ड किंवा एक ई-सिम आणि एक फिजिकल सिम कार्डची गरज असते.
MEP चा उपयोग काय
यावर गुगल 2020 पासून उपाय शोधत आहे जो अँड्रॉइड 13 मध्ये Multiple Enabled Profiles (MEP) नावानं सादर करण्यात येईल. यात सिंगल ई-सिम प्रोफाईलवर दोन टेलिकॉम कंपन्यांची सेवा वापरत येईल. या फीचरमुळे स्मार्टफोनमधील जागा वाढेल, ज्याचा वापर स्मार्टफोन कंपन्या चांगली अतिरिक्त कॅमेरा सेन्सर किंवा अन्य फीचर्स देण्यासाठी करू शकतात.