गुगलवरही दिसणार न्यूज फिड
By शेखर पाटील | Published: July 22, 2017 03:52 PM2017-07-22T15:52:19+5:302017-07-25T16:08:25+5:30
गुगलने आता आपल्या डेस्कटॉप आणि स्मार्टफोन आवृत्तीसाठी न्यूज फिडची सुविधा प्रदान केली असून या माध्यमातून युजरला त्याच्या आवडीशी संबंधीत कंटेंट दर्शविण्यात येणार आहे.
गुगलने आता आपल्या डेस्कटॉप आणि स्मार्टफोन आवृत्तीसाठी न्यूज फिडची सुविधा प्रदान केली असून या माध्यमातून युजरला त्याच्या आवडीशी संबंधीत कंटेंट दर्शविण्यात येणार आहे.
फेसबुक आणि ट्विटरसारख्या साईटवर न्यूज फिड लोकप्रिय आहेत. यात युजरला त्याच्या मित्रांच्या अपडेटसह त्याने फॉलो/लाईक केलेल्यांची अद्ययावत माहिती दिसत असते. या दोन्ही न्यूज फिड अतिशय गतीमान आहेत. याला आव्हान देण्यासाठी गुगलने कधीपासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी गुगल नाऊ हा कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारा डिजीटल असिस्टंट सादर करण्यात आला होता. मात्र आता याऐवजी गुगलने युजरसाठी न्यूज फिड प्रदान केली आहे. अर्थात गुगल नाऊला आता गुगलच्या सर्चसह अन्य महत्वाच्या प्रॉडक्टमध्ये विलीन करण्यात आले आहे.
आपण गुगलवरून असंख्य बाबींना सर्च करत असतो. नेमक्या याच सर्च हिस्ट्रीचा वापर करून संबंधीत युजरला त्याच्याशी संबंधीत बातम्या, व्हिडीओज, म्युझिक आणि सर्व हॅपनींग्ज आता न्यूज फिडमध्ये दिसणार आहे. संगणक तसेच अँड्रॉइड व आयओएस प्रणालींचा वापर करणार्यांना हे फिचर देण्यात आले आहे. अर्थात आपण आधी क्रिकेटबाबत सर्च केले असल्यास आपल्याला याच्याशी संबंधीत विविध स्त्रोतांवरील माहिती देण्यात येईल. विशेष म्हणजे क्रिकेट व त्याच्याशी संबंधीत अन्य टॉपीक फॉलो करण्याची सुविधाही यात असेल. यामुळे अर्थातच आपल्या न्यूज फिडमध्ये नियमितपणे क्रिकेटचे अपडेट दर्शविण्यात येतील. गुगलवरील न्यूज फिडचा वापर हा आता प्राथमिक अवस्थेत असला तरी भविष्यात या माध्यमातून गुगल आपल्या युजर्सला सर्व अद्ययावत माहिती एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल हे निश्चित. अर्थात यामुळे फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल साईटला तगडे आव्हान उभे राहणार आहे. पहिल्या टप्प्यात हे फिचर अमेरिकेतील युजर्सला सादर करण्यात आले असून येत्या काही दिवसात भारतासह अन्य देशांमधील युजर्सला ते प्रदान करण्यात येणार आहे.