लवकरच येणार गुगलचा स्वतंत्र एआर हेडसेट
By शेखर पाटील | Published: May 21, 2018 01:15 PM2018-05-21T13:15:39+5:302018-05-21T13:15:39+5:30
गुगल एआर म्हणजेच ऑग्युमेंटेड रिअॅलिटी या तंत्रज्ञानावर आधारित स्वतंत्र हेडसेट विकसित करत असून लवकरच याला बाजारपेठेत सादर केले जाणार आहे.
गुगल एआर म्हणजेच ऑग्युमेंटेड रिअॅलिटी या तंत्रज्ञानावर आधारित स्वतंत्र हेडसेट विकसित करत असून लवकरच याला बाजारपेठेत सादर केले जाणार आहे. ऑग्युमेंटेड रिअॅलिटी म्हणजे विस्तारीत सत्यता होय. याला परिधान करणारा युजर आपल्या भोवतीच्या वातावरणात काल्पनीक रंग भरू शकतो. उदाहरणार्थ मी माझ्या घरात बसून याला परिधान केल्यानंतर माझ्या भोवती फुले पडत असल्याचा आभास यातून निर्माण करता येईल. मायक्रोसॉफ्ट कंपनीने आधीच या प्रकारातील होलोलेन्स हे उपकरण बाजारपेठेत सादर केले आहे. तथापि, गुगलचे ए६५ हे प्रॉडक्ट यापेक्षा थोडे वेगळे असेल असा दावा करण्यात येत आहे.
या संदर्भात विनफ्युचर या जर्मन टेक पोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे. यानुसार गुगलचे ए६५ हे स्टँडअलोन अर्थात स्वतंत्र हेडसेट या प्रकारातील मॉडेल असेल. म्हणजेच कोणत्याही उपकरणाला कनेक्ट न करतांनाही याचा वापर करता येईल. यात क्वॉलकॉम या कंपनीने विकसित केलेल्या क्युएससी६०३ या प्रोसेसरचा वापर केला जाणार आहे. या हेडसेटमध्ये अतिशय उच्च दर्जाचा कॅमेरा आणि सेन्सरचा वापरदेखील केलेला असेल. याच्या मदतीने युजर आपल्या भोवताली हव्या त्या पध्दतेचे प्रोजेक्शन करू शकणार आहे. तर यात दर्जेदार मायक्रोफोनसह गुगल असिस्टंटदेखील असेल. यामुळे युजर व्हाईस कमांडच्या मदतीने विविध फंक्शन्सचा वापर करू शकणार आहे.
गुगलने आधीच ऑग्युमेंटेड रिअॅलिटी या तंत्रज्ञानावर आधारित गुगल ग्लास आणि डे-ड्रीम ही उपकरणे सादर केेलेली आहेत. यातील गुगल ग्लासबाबत पहिल्यांदा खूप औत्सुक्याचे वातावरण होते. तथापि, याला बाजारपेठेत फारसा प्रतिसाद लाभला नाही. यामुळे याचे उत्पादन बंद करण्यात आले असून याला नवीन स्वरूपात सादर करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमिवर, गुगलच्या आगामी हेडसेटकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.