भाषेचा वाद मिटणार! संभाषण सुरु असतानाच भाषांतर Google च्या चष्म्यावर दिसणार; पाहा Video
By सिद्धेश जाधव | Published: May 12, 2022 07:12 PM2022-05-12T19:12:39+5:302022-05-12T19:15:05+5:30
Google AR Glasses: गुगलनं आपल्या इव्हेंटमधून AR Glasses जगासमोर ठेवले आहेत, ज्याचे फीचर्सपाहून लोक थक्क झाले आहेत.
Google नं अनेक घोषणा आपल्या यंदाच्या I/O इव्हेंटमधून केल्या आहेत. कालच्या दिवसाची सांगता कंपनीनं AR Glasses जगासमोर ठेऊन केली. या स्मार्ट चष्म्याचं खास फिचर एका व्हिडीओमधून कंपनीनं दाखवल. हा चष्मा तुमच्या डोळ्यांसमोर सुरु असलेला संभाषण भाषांतरित करून दाखवू शकतो. समोरच्या व्यक्तीची भाषा कोणतीही असो ती संभाषण सुरु असतानाच फक्त भाषांतरित केली जाणार नाही तर तुमच्या चष्म्यांमधील डिस्प्लेवर दाखवली जाईल.
उदाहरणार्थ, तुम्हाला हिंदी येत नसेल आणि समोरच्या व्यक्तीला मराठी येत नसेल तर तुमच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी गुगलचा हा चष्मा मदत करेल. समोरच्या व्यक्तीच हिंदी मराठीत भाषांतरित करण्यात येईल आणि तुमच्या गुगल एआर ग्लासवर दाखवण्यात येईल.
हा चष्मा बाजारात कधी येईल याची माहिती मात्र कंपनीनं सांगितली नाही. शेयर केलेल्या व्हिडीओमधून या चष्म्याचा वापर दाखवण्यात आला आहे. भविष्यात हा AR Glass खूप उपयुक्त ठरू शकतो. या चष्म्याच्या समोर माईक देण्यात आला आहे, जो सुरु असलेला संभाषण रेकॉर्ड करतो. व्हिडीओमध्ये अनेक उदाहरणं दाखवण्यात आली आहेत, जिथे याचा वापर केला जाऊ शकतो.
फक्त चष्मा नव्हे
Google च्या I/O इव्हेंटमधून फक्त हाच एक डिवाइस सादर करण्यात आला नाही. कंपनीनं Google Pixel 6A हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर केला आहे, ज्यात देखील हे लाईव्ह ट्रान्सलेशन फिचर मिळतं. त्याचबरोबर Google Pixel Buds Pro देखील लाँच करण्यात आले आहेत. या इव्हेंटमधून Google Pixel Watch आणि Google Pixel Tablet वरून पडदा उठवण्यात आला आहे. Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोनची झलक देखील बघायला मिळाली आहे.