गोप्रो हिरो ६ ब्लॅक अॅक्शन कॅमेरा जागतिक बाजारात दाखल
By शेखर पाटील | Published: October 3, 2017 11:23 AM2017-10-03T11:23:43+5:302017-10-03T11:37:18+5:30
गोप्रो कंपनीने आपला हिरो ६ ब्लॅक हा नवीन अॅक्शन कॅमेरा जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. गोप्रो कंपनी अॅक्शन कॅमेर्यांच्या उत्पादनात अग्रेसर आहे
गोप्रो कंपनीने आपला हिरो ६ ब्लॅक हा नवीन अॅक्शन कॅमेरा जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. गोप्रो कंपनी अॅक्शन कॅमेर्यांच्या उत्पादनात अग्रेसर आहे. आपल्या या लौकीकाला जपत कंपनीने हिरो ६ ब्लॅक हा नवीन कॅमेरा जाहीर केला आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर याची नोंदणी सुरू झाली आहे. अमेरिकेत याचे मूल्य ४९९ डॉलर्स असले तरी भारतात मात्र हा कॅमेरा ४५,००० रूपये मूल्यात लिस्ट करण्यात आला आहे.
यात जगातील सर्वात उत्तम दर्जाची व्हिडीओ स्टॅबिलायझेशन प्रणाली प्रदान करण्यात आल्याचा दावा गोप्रो कंपनीने केला आहे. यात अतिशय गतीमान असा जीपी१ इमेज प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. तो अतिशय गतीमान, स्थिर आणि कमी उजेडातही चांगल्या दर्जाचे चित्रीकरण करू शकतो. याच्या मदतीने फोरके६० म्हणजेच फोर-के क्षमतेचे तसेच ६० फ्रेम्स प्रति-सेकंद या गतीचे तसेच १०८०पी२४० म्हणजेच फुल एचडी क्षमतेचे २४० फ्रेम्स प्रति-सेकंद इतक्या गतीने चित्रीकरण करता येणार आहे. या कॅमेर्याच्या मदतीने करण्यात आलेल्या व्हिडीओ चित्रीकरणाला गोप्रो अॅप स्वयंचलीत पध्दतीने क्विकस्टोरीमध्ये परिवर्तीत करते. यानंतर हा व्हिडीओ अगदी सहजपणे सोशल मीडियात शेअर करता येतो. विशेष बाब म्हणजे हा कॅमेरा वॉटरप्रूफ असून पाण्याखाली दहा मीटर खोलीपर्यंत चित्रीकरण करू शकतो. तसेच याचा अगदी रफ वापरदेखील शक्य आहे. यामुळे विषम वातावरणातही हा कॅमेरा अतिशय सहजपणे चित्रीकरण करू शकतो.
गोप्रो हिरो ६ ब्लॅक अॅक्शन कॅमेरा टच झूम या विशेष फिचरने सज्ज आहे. याच्या मदतीने वाय-फायवर तीन पट अधिक गतीने व्हिडीओजचे वहन करता येते. आधीच्या मॉडेल्सप्रमाणेच यात वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. यात १० भाषांचा सपोर्ट असणारी ध्वनी आज्ञावलीदेखील असेल. हा कॅमेरा गोप्रो कंपनीच्या सर्व विद्यमान माऊंटवर फिक्स करता येणार असून या कंपनीच्या कर्मा ड्रोनलादेखील संलग्न करता येणार आहे.