चुकूनही डाऊनलोड करू नका 'अशी' अ‍ॅप्स, होईल नुकसान; मोदी सरकारचं आवाहन

By कुणाल गवाणकर | Published: September 22, 2020 09:27 PM2020-09-22T21:27:34+5:302020-09-22T21:28:02+5:30

कोरोना काळात बोगस अ‍ॅप्सचा सुळसुळाट; माहिती चोरीला जाण्याचा मोठा धोका

Government of India warns users against downloading these kind of apps | चुकूनही डाऊनलोड करू नका 'अशी' अ‍ॅप्स, होईल नुकसान; मोदी सरकारचं आवाहन

चुकूनही डाऊनलोड करू नका 'अशी' अ‍ॅप्स, होईल नुकसान; मोदी सरकारचं आवाहन

Next

नवी दिल्ली: कोरोना काळात अनेक अ‍ॅप्सच्या मदतीनं डेटा चोरी करण्याचे प्रकार अगदी सर्रासपणे सुरू आहेत. कोरोनाची लागण झाल्यावर शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण सातत्यानं तपासून पाहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. याचाच गैरफायदा काही बोगस अ‍ॅप्स निर्मात्यांकडून घेतला जात आहे. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण तपासणारी कोणतीही अ‍ॅप्स अज्ञात यूआरएलच्या माध्यमातून डाऊनलोड करू नका, असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.  

ऑनलाईन फसवणुकीपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी सरकारकडून सायबर दोस्त नावाचं ट्विटर हँडल सुरू करण्यात आलं आहे. या ट्विटर हँडलवरून शरीरातलं ऑक्सिजन तपासणाऱ्या बोगस ऑक्सिमीटर अ‍ॅप्सबद्दल नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. 'अज्ञात यूआरएलच्या मदतीनं ऑक्सिमीटर अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका. ही अ‍ॅप्स वापरकर्त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन तपासत असल्याचा दावा करतात. मात्र ही अ‍ॅप्स फेक असू शकतात. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून तुमची खासगी माहिती, फोटो, संपर्क क्रमांक आणि इतर तपशील चोरीला जाऊ शकतो. ही अ‍ॅप्स वापरकर्त्यांकडे बायोमेट्रिक फिंगरप्रिंट मागतात. त्यामुळे या अ‍ॅप्सच्या माध्यमातून बायमेट्रिक माहितीदेखील चोरी होण्याचा धोका असतो,' असं सायबर दोस्तनं म्हटलं आहे.

नागरिकांनी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनच्या प्रमाणावर लक्ष ठेवावं, असं आवाहन सातत्यानं आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणं धोक्याचं लक्षण आहे. त्यामुळे बाजारासह ई-कॉमर्स साईट्सवर ऑक्सिमीटर्स उपलब्ध आहेत. मात्र तरीही अनेकजण अ‍ॅप्सच्या माध्यमातून शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजण्याचा पर्याय निवडतात. मात्र यामध्ये बोगस अ‍ॅप्सच्या माध्यमातून खासगी माहिती चोरीला जाण्याचा मोठा धोका आहे. 

केंद्रीय गृह मंत्रालयानं ऑनलाईन फसवणुकीपासून सतर्क करण्यासाठी सायबर दोस्त ट्विटवर हँडल सुरू केलं आहे. या माध्यमातून सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम करण्यात येतं. या महिन्याच्या सुरुवातीला सायबर दोस्तनं व्हेरिफिकेशन आणि ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यानंतरच ई-वॉलेट अ‍ॅप्स स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला होता. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोर आणि गुगलच्या प्ले स्टोरमधूनच अ‍ॅप्स डाऊनलोड करा. एसएमएस, ईमेल किंवा सोशल मीडियावरून येणाऱ्या लिंकवरून अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका. त्यातून फसवणूक होण्याचा धोका असल्याची सूचना सायबर दोस्तनं केली होती.
 

Web Title: Government of India warns users against downloading these kind of apps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.