अलर्ट! Google Chrome आणि Firefox बाबत सरकारची 'वॉर्निंग'; लगेच करा 'हे' काम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 07:44 AM2022-06-12T07:44:42+5:302022-06-12T07:45:55+5:30
मोबाईलवर असो किंवा कॉम्प्युटरवर, इंटरनेटचा वापर करून कोणतीही सामग्री शोधण्यासाठी आपल्यापैकी बहुतांश लोक गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स या दोन ब्राउझर्सचा वापर करतात.
मोबाईलवर असो किंवा कॉम्प्युटरवर, इंटरनेटचा वापर करून कोणतीही सामग्री शोधण्यासाठी आपल्यापैकी बहुतांश लोक गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स या दोन ब्राउझर्सचा वापर करतात. सर्वात सुरक्षित ब्राउझर म्हणून दोन्हीची ओळख असली तरी गुरुवारी भारत सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) या एजन्सीने दोन्ही ब्राउझर्सच्या वापरकर्त्यांसाठी उच्चस्तरीय चेतावणी जारी केली आहे.
क्रोम आणि मोझिलामध्ये काही गंभीर त्रुटी आढळल्या असून हॅकर्स या बगद्वारे सर्व प्रकारची सुरक्षा भेदू शकतात. यामुळे हॅकर्स कोणत्याही सामान्य वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा ॲक्सेस करून सहज चोरू शकतात. संवेदनशील माहितीही उघड करू शकतात. एजन्सीने या बग्सना 'हाय-रिस्क' म्हणून चिन्हांकित केले आहे.
तसेच, सर्व भारतीय वापरकर्त्यांना गुगल क्रोम किंवा मोझिला वापरताना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. शिवाय, हॅकर्सच्या हल्ल्यापासून बचावासाठी तातडीने दोन्ही ब्राउझर्सचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोझिला आणि गुगलनेही त्रुटी दूर केल्याचे सांगितले असून लेटेस्ट व्हर्जन वापरण्याचा सल्ला दिला आहे.
धोका कोणाला?
गुगल क्रोम ऑपरेटिंग सिस्टीम 96.0.4664.209 च्या आधीचे व्हर्जन वापरणाऱ्यांना
मोझिला फायरफॉक्स आयओएस १०१ च्या आधीचे व्हर्जन वापरणाऱ्यांना
मोझिला फायरफॉक्स ईएसआर ९१.१० च्या आधीचे व्हर्जन वापरणाऱ्यांना
मोझिला फायरफॉक्स थंडरबर्ड ९१.१० च्या आधीचे व्हर्जन वापरणाऱ्यांना
मोझिला फायरफॉक्स १०१ च्या आधीचे व्हर्जन वापरणाऱ्यांना
कोणते व्हर्जन कराल डाऊनलोड?
गुगल क्रोमचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करा
मोझिला फायरफॉक्स १०१, मोझिला फायरफॉक्स आयओएस १०१, मोझिला फायरफॉक्स ईएसआर ९१.१० आणि मोझिला फायरफॉक्स थंडरबर्ड ९१.१० हे व्हर्जन डाउनलोड करा.