चीनला तगडा झटका! जगातील एकूण उत्पादनापैकी अर्धे iPhone आता भारतातच बनणार, Apple ची मोठी तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 02:22 PM2023-01-18T14:22:36+5:302023-01-18T14:24:12+5:30
Made In India iPhones: चीन, भारत आणि Apple हे समीकरण येणाऱ्या काळात जागतिक बाजारपेठेत मोठा उलटफेर आणू शकतात.
Made In India iPhones: चीन, भारत आणि Apple हे समीकरण येणाऱ्या काळात जागतिक बाजारपेठेत मोठा उलटफेर आणू शकतात. Apple जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचे आयफोन विकते आणि याचा बहुतांश उत्पादन चीनमध्ये होतं.
चीन आयफोनचा सर्वात मोठा निर्माता देश आहे. पण आता ही आकडेवारी वेगानं बदलू लागली आहे. नव्या रिपोर्टनुसार साल २०२७ पर्यंत जगभरात एकूण विक्री होणाऱ्या iPhone पैकी निम्मे आयफोन 'मेड इन इंडिया' असतील. याआधीही यासंदर्भातील एक अहवाल समोर आला होता. ज्यात २०२५ पर्यंत जगभरातील एकूण २५ टक्के आयफोन भारतात बनणार असल्याचा दावा करण्यात आला होता. याची चर्चा केवळ भारतातच नव्हे, तर चीनमध्येही होत आहे.
Apple कडूनही चीनमधील उत्पादनात केली जातेय घट
अॅपल कंपनी आता चीनवरचं अवलंबीत्व कमी करू पाहत असल्याची जाणीव आता चीनलाही झाली आहे. कंपनीच्या या भूमिकेचा फायदा भारत आणि व्हिएतनामला होत आहे. Apple कंपनीच्या चीनच्या बाजारपेठेवरील अवलंबित्वाच्या बातम्या आपण याआधीपासूनच पाहात आलो आहोत. मग कोरोना महामारीमुळे याचं चित्र आता पूर्णपणे बदललं आहे. चीनमधील कोरोना विस्फोटामुळे चीनमधील आयफोनच्या फॅक्ट्रीमधील उत्पादनावरही मोठा परिणाम झाला. दर आठवड्याला कंपनीला अब्जावधी डॉलरचं नुकसान भोगावं लागलं आहे.
अॅपल कंपनीकडून चीनवरील अवलंबित्व गेल्या वर्षापासून हळूहळू कमी केलं जात आहे. दुसरीकडे भारत एक असा देश आहे जिथं सर्वात मोठं उत्पादन केंद्र म्हणून विकसीत होत आहे. गेल्या वर्षी Apple नं सप्टेंबरमध्ये iPhone 14 चं उत्पादन भारतात सुरू केलं.
भारतात तयार होणार लेटेस्ट आयफोन
कंपनी चीन आणि भारतात अशा दोन्ही ठिकाणी आयफोन-१४ चं उत्पादन करण्यास इच्छुक होती. पण असं होऊ शकलं नाही. चीनमधील कोरोना परिस्थिती यामागचं मोठं कारण समजलं जात आहे. आता आयफोन-१५ च्याबाबतीतही असंच होऊ शकतं. एका रिपोर्टनुसार, भारतात सध्या २.२७ टक्के Apple कंपनीची सप्लायर फॅसिलीटी आहे. म्हणजे भारत आयफोन उत्पादनाच्या बाबतीत ८ व्या स्थानावर आहे. भारताच्या आधी अमेरिका, चीन, जपान, युके, तैवान, फ्रान्स आणि द.कोरिआचा नंबर लागतो. पण हे चित्र आता लवकरच बदलणार आहे. साल २०२७ पर्यंत जगातील प्रत्येक दुसरा आयफोन हा 'मेड इन इंडिया' असेल.