Happy Republic Day 2018 : गुगलने डुडलच्या माध्यमातून साकारली भारताची विविधतेने नटलेली संस्कृती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 11:59 AM2018-01-26T11:59:58+5:302018-01-26T12:01:01+5:30
गुगलनं डुडलच्या माध्यमातून भारताच्या 69 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई- गुगलनं डुडलच्या माध्यमातून भारताच्या 69 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. वैविध्यतेने नटलेल्या भारताचं दर्शन गुगलने डुडलच्या माध्यमातून घडवलं आहे. विविध भाषा, परंपरा, कला, जैवविविधतेनं नटलेला भारत डुडलनं साकारला असून भारताची विविधतेने नटलेली संस्कृती पाहायला मिळते आहे. डुडलमध्ये भारताच्या राज्यातील कलाविष्कार पाहायला मिळत आहे.
भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचं एक नवं पर्व सुरू झालं म्हणून आजता दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो. 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला होता. भारतात पहिला प्रजासत्ताक दिन 1950 साली साजरा करण्यात आला होती.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्लीतील राजपथावर परेडचं आयोजन केलं जातं. या परेड समारंभात विविध दलांकडून चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली जातात. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून विविध देशातील राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचीही परंपरा सुरू झाली. पहिल्या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो भारताचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यावर्षीही इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं.