'पोकेमॉन गो'प्रमाणे येणार हॅरी पॉटर गेम
By शेखर पाटील | Published: November 13, 2017 12:32 PM2017-11-13T12:32:34+5:302017-11-13T12:34:00+5:30
जगभरातील कोट्यवधी गेमर्सला वेड लावणा-या पोकेमॉन गोप्रमाणेच आता हॅरी पॉटर मालिकेचे मायावी विश्वदेखील गेमच्या स्वरूपात येणार आहे.
निअँटीक लॅबने सादर केलेल्या पोकेमॉन गो गेमला जगात अभूतपुर्व प्रतिसाद लाभला आहे. अर्थात पहिल्या काही महिन्यांमध्ये या गेमबाबत तयार झालेला हाईप बर्याच प्रमाणात कमी झाला असला तरी याची युजर्स संख्या सातत्याने वाढत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यातून निअँटीक लॅबला मोठ्या प्रमाणात उत्पन्नदेखील मिळू लागले आहे. याच्या विविध आवृत्त्यादेखील सादर करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमिवर, निअँटीक लॅबने हॅरी पॉटर : विझार्डस् युनाईट गेम या नावाने नवीन गेम सादर करण्याची घोषणा केली आहे. वॉर्नर ब्रदर्स इंटरअॅक्टीव्ह एंटरटेनमेंट आणि डब्ल्यूबी गेम्स यांच्या सहकार्याने हा नवीन गेम लाँच करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
निअँटीक लॅबने आपल्या या आगामी गेमबाबत फारशी माहिती वा टिझर प्रदर्शीत केलेला नाही. तथापि, एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याची प्राथमिक माहिती दिली आहे. पोकेमॉन गो हा गेम ऑग्युमेंटेड रिअॅलिटी (एआर) म्हणजेच विस्तारीत सत्यतेवर आधारित आहे. याचप्रमाणे हॅरी पॉटर : विझार्डस् युनाईट गेमही एआरवरच आधारित असेल. पोकेमॉन गो या गेममध्ये आपल्या भोवताली असणार्या विविध प्राण्यांना पकडायचे असते. याच पध्दतीने हॅरी पॉटर गेममध्ये या मालिकेतील विविध दुष्ट प्रवृत्तीच्या पात्रांशी लढण्याची संधी मिळणार आहे. पोकेमॉन गो प्रमाणेच हे सर्व खलनायक आपल्या भोवती विविध ठिकाणी दडून बसणार आहेत.
अर्थात यांचा अतिशय चित्तथरारक पध्दतीने सामना करण्याची संधी गेमर्सला या माध्यमातून मिळणार आहे. यात वैयक्तिक आणि सांघीक या दोन्ही पातळीवरून खेळण्याची सुविधा असेल. निअँटिक लॅबने सुमारे पाच वर्षापूर्वी सादर केलेल्या इनग्रेस या गेमप्रमाणेच हॅरी पॉटर गेमची संरचना असेल असे जाहीर करण्यात आले आहे. या घोषणेमुळे जगभरातील गेमर्समध्ये कुतुलहाचे वातावरण निर्मित झाले आहे. दरम्यान, या नवीन गेममुळे पोकेमॉन गो गेमचे होणार तरी काय? हा प्रश्न गेमर्स विश्वातून विचारला जात आहे. यावर निअँटीकने हे दोन्ही स्वतंत्र गेम असून पोकेमॉनच्या विविध आवृत्त्या येतील अशी ग्वाही देत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार २०१८च्या प्रारंभी हॅरी पॉटर : विझार्डस् युनाईट गेम लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे.