भारीच! जगात कुठेही पोहोचा केवळ २ तासांत, नासाचे एक्स-५९ लवकरच करणार उड्डाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 09:45 AM2023-07-27T09:45:01+5:302023-07-27T09:45:21+5:30
कॉनकॉर्ड हे सुपरसॉनिक विमान बंद झाल्यानंतर, जवळपास २० वर्षांनी त्याचे नवे स्वरूप येणार आहे.
वॉशिंग्टन : कॉनकॉर्ड हे सुपरसॉनिक विमान बंद झाल्यानंतर, जवळपास २० वर्षांनी त्याचे नवे स्वरूप येणार आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने या विमानाला एक्स-५९ असे नाव दिले आहे. कॉनकॉर्डपेक्षा त्याचा वेग कमी असेल. नासाचे तज्ज्ञ असे विमान बनविण्याच्या तयारीत आहेत, जे अवघ्या दोन तासांत जगाच्या कोणत्याही कोनाकोपऱ्यात पोहोचेल.
नासाचे एक्स-५९ लवकरच पहिले उड्डाण करणार आहे. ते कॉनकॉर्डपेक्षा लहान असेल. मात्र, त्याचा वेग ताशी १,५०० किलोमीटर असेल. यामुळे न्यूयॉर्क ते लंडन हा प्रवास सुमारे ३.३० तासांनी कमी होईल.
रॉकेटच्या वेगाने उडणार विमान
तज्ज्ञ तयार करत असलेल्या सबऑर्बिटल फ्लाइटचा वेग ५,६३२ किमी प्रति तास असेल. या विमानाद्वारे पृथ्वीवर कोठेही २ तासांत पोहोचता येईल.
हे विमान जेफ बेझोस यांच्या व्हर्जिन गॅलेक्टिक जेट प्रोग्रामच्या रॉकेटसारखे आहे. या विमानातून न्यूयॉर्क ते शांघाय हे अंतर केवळ ३९ मिनिटांत पूर्ण होईल. सध्या याला १५ तास लागतात.
हायप्रोफाईल अपघातानंतर...
कॉनकॉर्ड हे जगातील पहिले सुपरसॉनिक विमान प्रचंड वेग घेत असे. ते न्यूयॉर्क ते लंडन हे अंतर तीन तासांपेक्षा कमी वेळात कापत असे. ते ताशी २,१७२ किलोमीटर वेगाने उडत होते. २००० मध्ये एका हायप्रोफाइल अपघातानंतर हे विमान बंद करण्यात आले होते.
प्रवासाचा वेग अनेक पटींनी वाढविण्याचे प्रयोग केले जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास, सिडनी आणि लंडन (१६,९९६ किलोमीटर) दरम्यानचा प्रवास सध्या जो २२ तासांचा आहे, तो केवळ दोन तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण होईल.