अॅपल युजर्ससाठी केंद्राकडून हाय अलर्ट; सावधान, कधीही हॅक होऊ शकतो तुमचा आयफोन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 18:30 IST2025-04-07T18:30:00+5:302025-04-07T18:30:19+5:30
अॅपलची उत्पादने बहुतांश श्रीमंत लोक, महत्वाची लोक वापरत असतात. सर्वात सुरक्षित म्हणून या कंपनीच्या उत्पादनांची ख्याती आहे.

अॅपल युजर्ससाठी केंद्राकडून हाय अलर्ट; सावधान, कधीही हॅक होऊ शकतो तुमचा आयफोन...
आयफोन, आयपॅड, मॅकबुकसारखी महागडी डिव्हाईसेस वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या संस्थेने तुमची अॅपल डिव्हाईस हॅक होऊ शकतात, असा इशारा दिला आहे. अॅपलच्या डिव्हाईसेसमध्ये अनेक कमतरता असून त्याद्वारे हॅकर्स तुम्हाला लक्ष्य करू शकतात असे म्हटले गेले आहे.
अॅपलची उत्पादने बहुतांश श्रीमंत लोक, महत्वाची लोक वापरत असतात. सर्वात सुरक्षित म्हणून या कंपनीच्या उत्पादनांची ख्याती आहे. परंतू, गेल्या काही काळात अॅपलची डिव्हाईस हॅक केल्याची प्रकरणे राजकारणी, उद्योजकांसोबत घडली आहेत. संसदेतही याची वाच्यचा झाली आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी संस्था CERT-In (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) ने हा इशारा दिला आहे.
अॅपल डिव्हाईसमध्ये अनेक सुरक्षा त्रुटी आहेत. हॅकर्सनी याचा वापर केला तर ते तुमच्या डिव्हाइसवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात किंवा तुमचा डेटा चोरी करू शकतात. सिस्टम पूर्णपणे क्रॅश करू शकतात, असा इशारा सीईआरटी ईनने दिला आहे. आयफोन, आयपॅड, मॅकबुक, अॅपल टीव्ही अशा उपकरणांचा यात समावेश आहे.
सुरक्षा यंत्रणा बायपास करण्यासारख्या त्रुटी यात आहेत. स्पूफिंग किंवा सेवा नाकारणे (DoS) हल्ले करू शकतात. सिस्टिममधील तुमचे अधिकार वापरू शकतात, असे CIVN-2025-0071 या गाईडलाईन्समध्ये म्हटले आहे. हा धोक्याच्या इशारा उच्च पातळीच्या श्रेणीत ठेवण्यात आला असून जर तुमच्याकडील डिव्हाईसेस वेळेत अपडेट केली नाहीत तर ती हॅकर्सच्या नियंत्रणात जाण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. तुमचा डेटा बदलू शकतात. यामुळे सीईआरटीने सावध राहण्यास सांगितले आहे.