चार कॅमेर्यांनी सज्ज ऑनर 9 आय आता नवीन रंगात
By शेखर पाटील | Published: November 10, 2017 01:01 PM2017-11-10T13:01:25+5:302017-11-10T13:03:24+5:30
हुआवे कंपनीने चार कॅमेर्यांनी सज्ज असणारा आपला ऑनर ९ आय हा स्मार्टफोन आता ग्रॅफाईट ब्लॅक या रंगाच्या पर्यायामध्ये ग्राहकांना उपलब्ध केला आहे.
हुआवेची उपकंपनी असणार्या ऑनरने गेल्या महिन्यात ऑनर 9 आय हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारला होता. हा स्मार्टफोन प्रेस्टीज गोल्ड आणि अरोरा ब्ल्यू या दोन रंगांच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आला होता. आता याचे ग्रॅफाईट ब्लॅक या रंगाचे व्हेरियंट ग्राहकांना सादर करण्यात आले आहे.
ऑनर 9 आय या मॉडेलची खासियत म्हणजे यात चार कॅमेरे आहेत. यात मागील बाजूस एक कॅमेरा 16 तर दुसरा 2 मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा काढता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात ऑटो-फोकस, फेज डिटेक्शन, एलईडी फ्लॅश, टाईम लॅप्स, स्लो-मोशन व्हिडीओ कॅप्चर, पॅनोरामा आदी फिचर्स देण्यात आले आहेत. यात प्रतिमा काढून झाल्यानंतरही फोकस सेट करण्याची सुविधा असेल. यामुळे आधी काढण्यात आलेल्या छायाचित्रांमधून हव्या त्या प्रतिमेला फोटो इफेक्ट देता येणार आहे. तर सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात सॉफ्ट एलईडीसह 13 व 2 मेगापिक्सल्स क्षमतांचे फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत.
ऑनर 9 आय या मॉडेलमध्ये 18:9 अस्पेक्ट रेशो असणारा 5.9 इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच 2160 बाय 1080 पिक्सल्स क्षमतेचा 2.5 डी वक्राकार डिस्प्ले आहे. ऑक्टा कोअर किरीन 659 प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलची रॅम 4 जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज 64 जीबी असेल. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा आहे.हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारा असून यावर हुवे कंपनीचा इएमयुआय 5.1 हा युजर इंटरफेस असेल. तर यात फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 3340 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरही असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. हुआवे ऑनर 9 आय या स्मार्टफोनचे हे नवीन व्हेरियंट ग्राहकांना फ्लिपकार्टवरून ग्राहकांना 17 हजार 999 रूपये मूल्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे.